5500 हून अधिक नागरिक सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गाची सखोल स्वच्छता
नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे सर्वाधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असले तरी या रस्त्यावर स्वच्छता असावी व नवी मुंबईचा स्वच्छ शहर नावलौकिक कायम रहावा यादृष्टीने महानगरपालिका नेहमीच सतर्क असते.
याच अनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आयोजित करावयाच्या स्वच्छताविषयक विविध उपक्रमांमध्ये आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सायन पनवेल महामार्गाची सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचे प्राधान्याने निर्देश दिले व त्यासोबत ठाणे बेलापूर मार्ग या शहरातील आणखी एका वर्दळीच्या मार्गावरही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार आज रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीमेत व्यापक प्रमाणात लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून या दोन्ही महत्वाच्या मार्गांच्या दुतर्फा स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले. 17 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात दररोज आयोजित करण्यात येणा-या स्वच्छताविषयक उपक्रमांनी प्रेरित झालेल्या 5 हजार 500 हून नवी मुंबईकर नागरिकांनी आज महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींसमवेत सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर यशस्वीरित्या सखोल स्वच्छता मोहीम राबवली.
विशेष म्हणजे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांचे 2700 हून अधिक श्रीसदस्य हे पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्ग सखोल स्वच्छता महामोहीमेत सक्रिय सहभागी होते.
सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सखोल स्वच्छता महामोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. वाशी, तुर्भे व सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणा-या सायन पनवेल महामार्गाच्या स्वच्छता मोहीमेत महापालिका अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतामित्र तसेच डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांना महामार्गावरील क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते. यांच्यासमवेत त्या त्या विभागांच्या हद्दीतील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, एनएसएसचे विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे आपापल्या विभागात सहभागी झाले.
बेलापूर व नेरूळ भागातील सायन पनवेल महामार्गाची स्वच्छता करणा-या दोन्ही समुहांनी उरण फाटा येथे एकत्र येत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड व सर्व विभागप्रमुखांसमवेत स्वच्छतेची शपथ घेतली आणि प्रत्यक्ष स्वच्छता कार्याला सुरूवात झाली. नेरूळ विभागाच्या समुहाने जुईनगरच्या दिशेने तसेच बेलापूर विभागाच्या समुहाने कोकण भवनच्या दिशेने सायन पनवेल महामार्गाच्या दुतर्फा स्वच्छताकार्याला सुरूवात केली.
अशाच प्रकारे सर्व आठही विभागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्री.संतोष वारूळे तसेच परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली विभाग कार्यालयांना स्वच्छता क्षेत्र वाटून देण्यात आले होते. अशा सर्व ठिकाणी स्वच्छता शपथ घेऊन मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. महामार्गाची स्वच्छता करताना रस्त्यांच्या व पदपथांच्या कडेला पावसामुळे वाढलेले गवत काढून टाकण्यात आले तसेच आपोआप वाढलेली रानटी झाडांची रोपेही काढून टाकण्यात आली. याशिवाय अग्निशमन वाहनाव्दारे प्रक्रियाकृत पाणी फवारून रस्त्यांच्या कडेला जमा झालेला धूळीचा चिखलही साफ करण्यात आला. जेणेकरून हा चिखल नंतर सुकून त्याची धूळ तयार होऊन प्रदूषणात वाढ होऊ नये.
इतक्या मोठ्या संख्येने शहरातील मोठे मार्ग स्वच्छ करण्यासाठी दुतर्फा लोक उतरल्याने नवी मुंबईत स्वच्छतेची एक मोठी चळवळ उभी राहिल्याचे चित्र अनुभवयाला मिळाले. या मार्गांवरून प्रवास करणारे प्रवासीही सुरू असलेल्या स्वच्छता मोहीमेकडे कुतुहलाने बघत होते. काही खाजगी वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून छायाचित्रे काढत मोहीमेची प्रशंसाही केली.
‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेतील प्रत्येक कार्यक्रमाला मिळणारा नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरील उत्साही प्रतिसाद नवी मुंबईकरांची एकता आणि स्वच्छतेविषयीची बांधिलकी दर्शविणारा असून त्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे आभार व्यक्त करीत 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता ही सेवा मोहीमेच्या नियोजित सांगता समारंभामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
Published on : 30-09-2024 14:01:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update