पपेट शो विद्यार्थ्यांच्या मनात रूजवताहेत मनोरंजनातून स्वच्छतेचा संदेश
![IMG-20200122-WA0010.jpg IMG-20200122-WA0010.jpg](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2020/01/mediafiles/IMG-20200122-WA0010.jpg)
'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये देशात सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका लोकसहभागातून सज्ज असताना स्वच्छता ही नागरिकांची नियमित सवय व्हावी याकरिता विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये शहराचे व देशाचे भविष्य असणा-या मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
यादृष्टीने स्वच्छतेच्या अनुषंगाने चित्रकला, निबंध अशा कलात्मक स्पर्धा सादरीकरणाला मुक्त वाव देतानाच शाळाशाळांमध्ये मनोरंजक पपेट शो आयोजित केले जात आहेत. मुलांमध्ये लोकप्रिय असणारे जंगल बुकच्या मोगलीचे पात्र आणि त्याचे जीवलग मित्र भालू, सिम्बा व हिरा यांची बाहुल्यांच्या स्वरूपातील पात्रे कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त नवी मुंबई शहराला भेट देतात आणि इथल्या स्वच्छतेने हरकून जातात. शहरात फिरता फिरता त्यांची स्वत:कडे बघण्याची दृष्टी बदलून जाते आणि माझा कचरा ही माझीच जबाबदारी असल्याचे त्यातील प्रत्येकाला पटते अशा आशयाचे कथानक असणारा हा पपेट शो विद्यार्थ्यांना खूप आवडत असल्याचे त्यांनी आत्तापर्यंत विविध शाळांमध्ये केलेल्या 14 प्रयोगांतून दिसून आले आहे. सादरीकरणानंतर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून हे कलावंत प्रश्नोत्तर स्वरूपात विद्यार्थ्यांकडूनच त्यांना स्वच्छतेविषयी तसेच आपल्या कचरा न करण्याच्या जबाबदारीविषयी काय वाटते याची मते जाणून घेतात. यातून स्वच्छतेविषयीच्या माहितीची उजळणी केली जाते आणि हा स्वच्छतेचा संदेश आपल्या घरापर्यंत, वसाहतीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही या विद्यार्थ्यांकडे सोपविली जाते.
मुद्रा द थिएटर ग्रूप हा अनेक वर्षांपासून नाट्य चळवळीशी संबंधित असणारा भरत मोरे, अनिकेत भोईर, अंकित म्हात्रे, अजिंक्य गोविलकर, मयुरी मोहिते असा कलावंत समुह नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता संदेश प्रसार मोहिमेचे काम पपेट शो सारख्या मनोरंजक माध्यमाव्दारे करीत असून स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे काय, ओला कचरा - सुका कचरा वर्गीकरण, त्याची गरज, शहर स्वच्छतेत नागरिक म्हणून आपली जबाबदारी याविषयी मनोरंजक पध्दतीने प्रबोधन करीत आहे.
नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी झाले असून मागील वर्षी 2019 मध्ये स्वच्छतेत असलेला आपला देशातील सातवा क्रमांक उंचावत यावेळी देशात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनण्याचे ध्येय आपण नजरेसमोर ठेवले आहे. याकरिता स्वच्छता ॲपवर आपल्या शहराचे मानांकन उचाविण्यासाठी स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिकांनी शहर स्वच्छतेविषयी विचारण्यात आलेल्या 7 प्रश्नांच्या अनुषंगाने शहराचे बदललेले रूप लक्षात घेत सकारात्मक दृष्टीकोन पैकीच्या पैकी गुण द्यावेत तसेच आपले शहर ओडीएफ डबल प्लस मानांकित व प्रमाणित शहर आहे तसेच आपल्या शहराला कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग मिळालेले आहे याची उत्तरे देताना काळजीपूर्वक नोंद घ्यावी असे आवाहन करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई शहराचा राज्यातील पहिला क्रमांक कायम राखत देशातील पहिल्या क्रमांकापर्यंत झेप घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले 100 टक्के योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.
Published on : 22-01-2020 13:28:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update