त्रिजिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेत बाळकूम ठाणेचे राष्ट्रीय ब्रास बँड पथक अंतिम विजेते
नवी मुंबई महानगरपालिकेची ओळख ही राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आहेच, विविध स्पर्धांच्या माध्यमातून सांस्कृतिक शहर हीदेखील नवी मुंबईची ओळख सर्वदूर व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुणवंताना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात, तशाच प्रकारे नवी मुंबई बाहेरील गुणवंतांचे कौशल्य नवी मुंबईकरांना अनुभवता यावे यादृष्टीने जिल्हा व राज्य स्तरावरील स्पर्धांचे आयोजनही करण्यात येत असते असे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी आपण एकेकाळी बँडवादक होतो याचा अभिमान वाटतो अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळमधील वंडर्स पार्क मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ठाणे, रायगड व मुंबई जिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर चषक ब्रास बँड स्पर्धेप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, आरोग्य समिताच्या सभापती श्रीम. शशिकला पाटील, स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नगरसेवक श्री. सुनिल पाटील, स्पर्धेचे 3 परीक्षक सुप्रसिध्द संगीत संयोजक श्री. मयुरेश माडगांवकर, वाद्यवृंद संयोजक श्री. सचिन भांगरे, संगीत विशारद श्री. प्रवीण कोळी, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे, श्री. राजेंद्र कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापाती डॉ. जयाजी नाथ यांनी या स्पर्धेमुळे अनेक उत्तमोत्तम गाण्यांच्या सुरावटी ऐकायला मिळाल्या आणि कानाचे पारणे फिटले अशा शब्दात अभिप्राय व्यक्त केला. ब्रास बँड स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबईतील वादकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्पर्धेचे परीक्षक संगीत संयोजक श्री. मयुरेश माडगांवकर यांनी संगीत संयोजन करताना आम्हांला वादक शोधावे लागतात मात्र या स्पर्धेमुळे आमची ती चिंता मिटली असल्याचे सांगत एखाद्या शहराचा महापौर पारंपारिक कला आणि संस्कृतीचा इतका विचार करतो हीच प्रशंसनीय बाब असल्याचे मत व्यक्त करीत महापौर महोदयांच्या कलाप्रेमाचे व गुणग्राहकतेचे कौतुक केले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रस्तरीय स्पर्धेत 8 ब्रास बँड पथके सहभागी झाली होती व दुस-या दिवशी ठाणे, रायगड व मुंबई अशा त्रिजिल्हास्तरीय स्पर्धेत वसईपासून उरणपर्यंत 11 पथके सहभागी झाली होती.
स्पर्धेच्या दुस-या दिवशीच्या त्रिजिल्हास्तरीय सत्रात सहभागी 11 पथकांमधून राष्ट्रीय ब्रास बँड बाळकुम, ठाणे हे त्रिजिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर चषक ब्रास बँड स्पर्धा विजेतेपदाचे मानकरी झाले. झंकार ब्रास बँड खारघर यांनी व्दितीय तसेच सूर संगम ब्रास बँड अटाळी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. जय गणेश ब्रास बँड कुकशेत यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. राष्ट्रीय ब्रास बँड बाळकुम ठाणे यांचा ट्रम्पेट समुह सर्वोत्कृष्ट ट्रम्पेट वादन, श्रीकृष्ण कला सर्कल पनवेल यांचा क्लारिओनेट वादकांचा समुह सर्वोत्कृष्ट क्लारिओनेट वादन त्याचप्रमाणे जय गणेश ब्रास बँड कुकशेत यांचा सॅक्सोफोन समुह सर्वोत्कृष्ट सॅक्सोफोन वादन आणि झंकार ब्रास बँड खारघर यांचा रिदम समुह सर्वोत्कृष्ट रिदम वादन पारितोषिकाचा मानकरी ठरला.
विशेष बाब म्हणजे सहभागी गांवदेवी ब्रास बँड पूर्णा भिवंडीच्या पथकात जान्हवी चौधरी आणि राष्ट्रीय ब्रास बँड बाळकुम ठाणे यांच्या पथकात अचल म्हात्रे या तरूणींनी वादक म्हणून सहभागी होत आता महिला याही क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून दिले. त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ब्रास बँड वादनाची ही स्वरअदाकारी अनुभवण्यासाठी वंडर्स पार्कच्या अँम्फीथिएटरमध्ये रसिकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती.
Published on : 26-01-2020 09:56:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update