नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने 10 ते 12 फेब्रुवारी 2020 या कालावधीत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या “नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2019-2020” च्या शुभारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे परिक्षक सुप्रसिध्द दिग्दर्शक श्री. पुरुषोत्तम बेर्डे, नामवंत अभिनेते, दिग्दर्शक श्री. विजय पाटकर, नामांकित अभिनेत्री श्रीम. पल्लवी पाटील, माजी परिवहन समिती सभापती श्री. प्रदिप गवस क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक श्री. विजय पाटकर यांनी नाट्य किंवा कोणतीही कला ही अथांग सागरासारखी असून आपण कायम विद्यार्थी असतो असे सांगत आज जरी परिक्षक म्हणून आलेलो असलो तरी या युवा पिढीकडून नवे काही शिकता येईल ही भूमिका विषद केली व अनुभवांची शिदोरी घेऊन जाईल असे मत व्यक्त केले. स्पर्धेत काहीजणांनाच बक्षिस मिळेल पण प्रत्येकाला नवा अनुभव मिळेल असेही ते म्हणाले.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही राज्यभरातून 21 नामांकित नाट्यसंस्था या स्पर्धेत सहभागी झाल्याचा संतोष व्यक्त करीत त्यामध्ये नवी मुंबई मधीलही नाट्य संस्था आणि कलावंत आहेत याचा विशेष आनंद वाटतो असे सांगितले. त्यामुळे राज्यस्तरीय पारितोषिकांप्रमाणेच नवी मुंबईतील नाट्य संस्थेला प्रोत्साहन म्हणून विशेष पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2019-2020 मध्ये प्राथमिक फेरी नसल्याने सर्व 21 एकांकिका अंतिम फेरीसारख्या प्रत्यक्ष प्रयोग स्वरूपात सादर होणार असल्याने नाट्यसंस्थांमध्ये चुरस आहे. पारितोषिकांचे स्वरूप रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकेस नवी मुंबई महापौर राज्यस्तरीय करंडक रू. 50 हजार रक्कमेच्या पारितोषिकासह प्रदान केला जाणार असून व्दितीय क्रमांकास रू. 30 हजार आणि तृतीय क्रमांकास रू. 15 हजार रक्कमेची पारितोषिक प्रदान केली जाणार आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट एकांकिकेस रु. 11 हजार इतकी पारितोषिक रक्कम प्रदान करण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा व वेषभूषा अशी वैयक्तिक स्वरुपातील प्रथम रू. 2 हजार, व्दितीय रू. 1500/- व तृतीय रू. 1 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2019-2020 चा पारितोषिक वितरण समारंभ दि. 12 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. संपन्न होणार असून याप्रसंगी सुप्रसिध्द अभिनेते श्री. अरूण नलावडे उपस्थित राहणार आहे. तरी 12 तारखेपर्यंत सकाळी 10 ते सायं. 7 वाजेपर्यंत चालणा-या या स्पर्धेमध्ये नवी मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, पालघर, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या दर्जेदार एकांकिका पाहण्यासाठी शहरातील कलाप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी के. नाथ यांच्या वतीने करण्यात येत आहे.