कोपरखैरणे विभागात कन्टेनमेंट झोनमध्ये स्पेशल मास स्क्रिनींग
कोपरखैरणे विभागातील कोरोना बाधीतांची वाढती संख्या रोखण्यासाठी नागरिकांचे मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेसह डॉ. डि.वाय.पाटील रुग्णालय आणि तेरणा रुग्णालय यांच्या 10 डॉक्टरांचा समूह कोपरखैरणे विभागातील कन्टेनमेंट झोनमध्ये नागरिकांची कोव्हीड-19 च्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करीत आहे.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कोपरखैरणे व तुर्भे विभागात मास स्क्रिनींगची मोहिम हाती घेण्यात आली असून 26 व 27 मे रोजी कोपरखैरणे विभागातील सेक्टर 15, 16, 17, 18 या भागात स्त्रीमुक्ती संघटनेच्या इमारतीतील तळमजल्यावर आयोजित कोव्हीड - 19 विशेष तपासणी शिबिरात 800 हून अधिक नागरिकांनी वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. त्यामधील कोरोना सदृष्य लक्षणे दिसणा-या 24 नागरिकांची स्वॅब टेस्टींग करण्यात आली.
28 मे रोजीच्या सेक्टर 23 येथील आजच्या शिबिरात सेक्टर 22, 23, 5 येथील 500 हून अधिक नागरिकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करीत डॉक्टरांच्या तपासणीचा व औषधोपचाराचा लाभ घेतला.
या मास स्क्रिनींगमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची 10 वैद्यकीय पथके कार्यरत असून त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांचे सहकार्य मिळत आहे. या तपासणीच्या अनुषंगाने नागरिकांचे थर्मल स्कॅनींग करण्यात येत असून त्यांच्याशी डॉक्टर संवाद साधत आहेत व त्यांच्या प्रकृती संबंधीत माहिती जाणून घेत त्यांची आरोग्य तपासणी करीत आहेत. एखाद्या व्यक्तीमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास पल्स ऑक्सिमिटरने त्याच्या शरीराची ऑक्सिजन पातळी त्वरीत तपासली जात असून त्यांच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब टेस्टींग करण्यात येत आहे.
उद्या कोपरखैरणे विभागात सेक्टर 1 ते 4 या कंन्टेनमेंट झोनमधील नागरिकांची महानगरपालिकेच्या सेक्टर 2 मधील शाळेत कोरोना विषयक वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यापुढील आठवड्यात तुर्भे विभागातही अशाचप्रकारची कोव्हीड-19 विशेष वैद्यकीय तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
नवी मुंबई शहर कोरोनामुक्त होण्यासाठी महानगरपालिका अथक प्रयत्न करीत असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने सापडलेल्या कंन्टेनमेंट झोनमध्ये कोपरखैरणे व तुर्भे विभागात स्पेशल मास स्क्रिनींग कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी कमीत कमी संपर्क होईल याकरिता घरातच थांबावे तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 28-05-2020 15:57:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update