जागतिक पर्यावरण दिनी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे वृक्षारोपण संपन्न
आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेरुळ येथील नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर विभागप्रमुखांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सींग राखून वृक्षारोपण संपन्न झाले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबईकर नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सध्याच्या कोरोना विरोधातील लढाईच्या काळात आपल्याला पर्यावरणाचे महत्व अधिक लक्षात आले असे सांगत पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आणि हवेतील प्राणवायुचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी या पावसाळी कालावधीत जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे त्याचप्रमाणे यापुढील काळात आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणशील शहर म्हणून अधिक नावाजले जाईल अशा प्रकारचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
यावेळी आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, उद्यान विभागाचे उप आयुक्त श्री.मनोज महाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन काळे, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, समाज विकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. क्रांती पाटील, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. अजय संख्ये, उद्यान विभागाचे सहा. आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, बेलापूर विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत सन 2020 मध्ये पावसाळ्यात करावयाच्या नियोजित वृक्ष लागवडीमध्ये जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेस 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्या अनुषंगाने या पावसाळा कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध जागा तसेच मोरबे धरण परिसर याठिकाणी 50 हजार वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये लोकसहभागालाही महत्व दिले जात असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध सोसायट्या यांनी मागणी केल्यास त्यांनाही मोफत वृक्षरोपे दिली जाणार आहेत. याकरिता सोसायट्यांनी आपल्या नजिकच्या विभाग कार्यालयातील उद्यान सहाय्यक यांच्याशी किंवा महानगरपालिका उद्यान विभागाचा दूरध्वनी क्रमांक 022-27567064 यावर संपर्क साधावा अथवा dmc_garden@nmmconline.com या इमेल वर मागणी नोंदवावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 05-06-2020 11:29:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update