वाशी डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयाला अचानक भेट देत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा

कोव्हीड 19 उपाययोजनांना गतीमानता देण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मिशन ब्रेक द चेन हाती घेतले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. यामध्ये कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी तपासणी, विलगीकरण व उपचार या त्रिसुत्रीचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यासोबतच कोरोना बाधीत रुग्णांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.
त्यास अनुसरून वाशी येथील महानगरपालिकेच्या डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयास आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अचानक भेट देऊन तेथील कामकाजाचा व उपचार पध्दतीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये त्यांनी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली व त्यामधील त्रुटी दूर कऱण्याबाबत निर्देश दिले. त्याचप्रमाणे रुग्णालयातील औषध साठ्याचा आढावा घेऊन आवश्यक औषध साठा त्वरीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांना दिल्या.
डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयात गंभीर स्वरुपाची लक्षणे असणारे कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी येत असल्याने त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले तसेच मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे व त्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे सूचित केले. तसेच कोणत्याही रुग्णास दुस-या रुग्णालयात स्थलांतरीत करावयाचे असल्यास अथवा घरी पाठवावयाचे असल्यास त्यांच्याकरीता विनाविलंब रुग्णावाहिकेची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक काळजीपुर्वक काम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी रुग्ण सेवेत कोणत्याही प्रकारची हयगय करु नये असे स्पष्ट निर्देश वैद्यकिय अधिक्षक आणि इतर अधिकारी, कर्मचारी यांना दिले.
सार्वजनिक रुग्णालयात कोव्हीड 19 तपासणीसाठी नागरी आरोग्य केंद्रामार्फत संदर्भित करण्यात आलेल्या तसेच लक्षणे जाणवत असल्याने तपासणीसाठी आलेल्या सर्व नागरिकांच्या ॲन्टीजन टेस्ट करण्यात याव्यात असे आयुक्तांनी स्पष्टपणे आदेशित केले. त्याचप्रमाणे तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसण्याची व्यवस्था करावी व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच कोरोना बाधीत रुग्णांना योग्य उपचार करणे ही आपली जबाबदारी असून त्याची रुग्णालयातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी जाणीव ठेवून कर्तव्य भावनेने समर्पित होऊन काम करावे अशा सूचना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अधिकारी, कर्मचारी वर्गास दिल्या.
Published on : 24-07-2020 13:28:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update