कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करताना जेथून प्रत्यक्ष कार्यवाही होते अशा स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी कार्यवाही होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विभाग कार्यालयांना भेटी देत तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.
या अनुषंगाने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वाशी विभाग कार्यालयाला भेट देऊन त्या विभागीय क्षेत्रातील कोरोना विषयक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला व वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, विभाग कार्यक्षेत्रातील जुहूगाव आणि वाशीगाव या दोन्ही नागरी केंद्रांच्या आरोग्य अधिकारी तसेच वाशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अधिक प्रभावी रितीने उपाययोजना राबविण्याचे निर्देशित केले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, वाशी विभागाचे समन्वय अधिकारी उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर उपस्थित होते.
कोव्हीड 19 च्या उपाययोजनांमध्ये मृत्यूदर कमी करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्राधान्याने नमूद करीत त्यादृष्टीने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, श्वसनविकार, किडनी विषयक व्याधी अशा इतर आजार असलेल्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याकरिता त्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आणखी तत्पर कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेशित केले.
आपल्या विभागीय क्षेत्रात कोणत्या भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडताहेत, कोणत्या क्षेत्रात मृत्यू होताहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवून शोध आणि तपासणी वाढविण्यावर भर देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णाला दिवसातून किमान 2 वेळा दूरध्वनी करून त्याच्या प्रकृतीची विचारणा करण्यात यावी असेही निर्देश दिले.
कोरोना बाधित सापडल्यानंतर महानगरपालिकेमार्फत 3 प्रकारची प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) जाहीर करण्यात येत असून, ज्या भागात आसपासच्या घरांमध्ये अथवा इमारतींमध्ये 5 पेक्षा अधिक कोरोना बाधित सापडलेले आहेत असे साधारणत: 100 मीटरचे क्षेत्र तिस-या प्रकारचे प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात येते. या तिस-या प्रकारच्या प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश देत तेथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या क्षेत्राच्या सर्व आत - बाहेर पडण्याच्या सीमा उंच बॅरेकेटींग लावून बंद कराव्यात व त्याठिकाणी अतिशय प्रभावी रितीने लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. यामध्ये पोलीस विभागाची महत्वाची भूमिका राहील असे स्पष्ट करीत आयु्क्तांनी वाशी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या. विभाग कार्यालयामार्फत त्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कशा उपलब्ध होतील याचे नियोजन करून औषधे, भाजी, अन्नधान्य पुरवठादारांची उपलब्धता करून द्यावी मात्र हे करताना लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिल्या. याकरिता स्थानिक पातळीवर तेथील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य घेण्याचे त्यांनी सूचित केले.
प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात यावे, यामध्ये प्रामुख्याने एकही ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असणा-या व्यक्ती राहता कामा नयेत असे स्पष्ट करीत जास्तीत जास्त अँटीजेन टेस्ट करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्या, वस्त्या यांच्या पदाधिका-यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी असेही त्यांनी विभागाच्या सहा. आयुक्तांना सूचित केले.
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संसर्गाची साखळी खंडीत करणे हे अत्यंत महत्वाचे त्यादृष्टीने शोध आणि तपासणी याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वाशी विभागाचा आढावा घेताना दिले.