कोरोनाबाधित दिवंगत महापालिका कर्मचारी यांच्या वारसांना कामगार कल्याण निधीची रक्कम प्रदान
![IMG_6312.JPG IMG_6312.JPG](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2020/10/mediafiles/IMG_6312.JPG)
कोरोना विरोधातील लढाईमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभांगातील अधिकारी, कर्मचारी अविश्रांत काम करीत आहेत. या अधिकारी, कर्मचारी यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून व्हावे याकडे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे विशेष लक्ष असून कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचारी यांचा उपचार कालावधी व बरे झाल्यानंतर तंदुरूस्त होऊन वैद्यकीय सल्ल्याने कामावर रूजू होण्याचा कालावधी कर्तव्य कालावधी मानण्यात येईल असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका सेवेतील जे अधिकारी, कर्मचारी कोव्हीड 19 शी संबंधित काम करीत असताना दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या 'प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' या योजनेअंतर्गत रु.50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"मधून "विशेष सानुग्रह अनुदान" म्हणून रू. 25 लक्ष अशी एकूण रू. 75 लक्ष रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे आरोग्य सेवेव्यतिरिक्त महानगरपालिका आस्थापनेवरील कोरोना विषयक सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्य या कार्यवाहीच्या कर्तव्यावर असणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"तून रुपये 50 लक्ष रक्कमेचे "विशेष सानुग्रह अनुदान" देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
त्यानुसार दिवंगत कनिष्ठ अभियंता चेतन पाटील यांच्या पत्नी श्रीम. राजश्री चेतन पाटील यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"मधून "विशेष सानुग्रह अनुदान" म्हणून रू. 50 लक्ष रक्कमेचा धनादेश अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या हस्ते, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. इतरही दिवंगत कर्मचा-यांच्या वारसांनाही महानगरपालिकेच्या वतीने विशेष सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान करण्यात येत आहे.
Published on : 13-10-2020 11:48:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update