जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी दाखले वितरणात कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही - आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश
महानगरपालिका कार्यालयात विविध कामांसाठी येणा-या नागरिकांशी प्रत्येक महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांचे वर्तन हे सौजन्याचेच असले पाहिजे असे स्पष्ट करीत कोणत्याही नागरिकाची अधिकारी, कर्मचारी यांच्या वर्तनाविषयीची तक्रार खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
एका नागरिकाने त्याला आपल्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येताहेत अशा सोशल मिडियावर केलेल्या तक्रारीची गंभीर दखल लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी आग्रही असलेल्या आयुक्तांनी घेतली व कोणतीही पूर्वसूचना न देता थेट ऐरोली विभाग कार्यालयाला अचानक भेट दिली. या अनपेक्षित भेटीने कार्यालयात लगबग उडालेल्या स्थितीत आयुक्तांनी थेट ऐरोली विभाग अधिकारी यांच्या दालनात जाऊन त्वरित विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणा-या नागरी सुविधा केंद्राची रजिस्टर मागवून घेतली व संबंधित कर्मचा-यांना बोलावून त्यांच्याकडून जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी असे दाखले देण्याविषयीची कार्यप्रणाली जाणून घेतली.
यानंतर रेकॉर्ड तपासताना 1.5 ते 2 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीतील जन्म, मृत्यू दाखल्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याने 3 कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. यापुढे त्यांचा खुलासा घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
यामध्ये जन्म प्रमाणपत्र 2 ते 3 वेळा विभाग कार्यालयात जाऊनही ते मिळत नसल्याची तक्रार करणा-या नागरिकाला झालेल्या त्रासाबद्दल आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली व तक्रारदार नागरिकाच्या नोंदीचा शोध घेऊन नागरिकांना आयुक्तांपर्यंत तक्रार दाखल करावी लागणे ही भूषणावह बाब नाही अशी कडक शब्दात समज दिली.
नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असताना त्यांना प्रमाणपत्रासाठी कार्यालयात येण्याची गरज भासता कामा नये - हे उद्दिष्ट आयुक्तांनी स्पष्ट केले व त्यानुसार नागरी सुविधा केंद्राच्या संगणकीय कार्यप्रणालीत आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे सध्या प्रचलित असलेल्या कार्यपध्दतीमध्ये नागरिकांना कमीत कमी वेळेत आणि त्रास न होता सुलभपणे प्रमाणपत्रे कशा रितीने मिळतील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या.
स्थानिक पातळीवर नागरिकांशी संवाद वाढवून नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत असे निर्देशित करीत आयुक्तांनी नागरी सुविधा केंद्राची वेळ नागरिकांना दिसेल अशाप्रकारे ठळकपणे प्रदर्शित करावी, प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेले अर्ज मोफत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावेत, प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जासोबत जोडणे गरजेची असलेली कागदपत्रे व कार्यवाहीच्या पध्दतीची नागरिकांना सौजन्यपूर्ण शब्दात माहिती देणे अशा विविध सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या व त्याची तत्परतेने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
जे नागरिक अर्ज व कागदपत्रे सादर करूनही बराच काळ प्रमाणपत्रे नेण्यासाठी येत नाहीत त्यांना आपली प्रमाणपत्रे तयार असल्याचा दूरध्वनी कार्यालयातून करण्यात यावा अथवा एस.एस.एस. किंवा इ मेल जावा अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
नागरिकांच्या महानगरपालिकेकडून असलेल्या अपेक्षा विहित वेळेत पूर्ण करणे व त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवणे हे महानगरपालिकेची नागरिकांच्या मनातील प्रतिमा उंचाविण्यासाठी गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी दाखले वितरणात कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नसल्याचे निर्देशित केले आहे.
Published on : 16-12-2020 08:40:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update