*लक्षवेधी मेस्कॉटव्दारे ओला व सुका कच-याच्या वर्गीकरणाची अभिनव रितीने जनजागृती*

'निश्चय केला, नंबर पहिला' हे ध्येय नजरेसमोर ठेवून वाटचाल करीत असताना निर्माण होतो त्याच ठिकाणी कच-याचे वर्गीकरण करणे व त्याचे वेगवेगळे संकलन करणे याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबतच्या जनजागृतीकरिता विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.
नागरिकांनी उरलेले अन्न, फळांच्या साली, शिल्लक भाज्या, फुलांचे हार अशा प्रकारचा ओला कचरा हिरव्या कचरापेटीत तसेच कागद, रबर, प्लास्टिक, बॉक्स, काच, धातू अशाप्रकारचा सुका कचरा निळ्या कचराकुंडीत टाकावा याकरिता निळ्या व हिरव्या कचरापेट्यांचे दोन आकर्षक मेस्कॉट तयार करण्यात आले आहेत. हे मेस्कॉट मार्केट्स, मॉल्स, गर्दीचे चौक, डेपो, स्टेशन्स अशा वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून हे मेस्कॉट नागरिकांशी सहज गप्पा मारत त्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्व सांगत आहेत व वर्गीकरणाविषयी प्रोत्साहीत करीत आहेत.
विशेषत्वाने बच्चे कंपनीमध्ये या मेस्कॉट्सचे आकर्षण दिसून येत असून त्यांच्याशी हात मिळविण्यासाठी मुले उत्साही असलेली दिसतात. मात्र हे मेस्कॉट मुलांना कचरा वर्गीकरणाविषयी माहिती विचारून योग्य उत्तर आले तरच हात मिळवतात अथवा त्यांच्याकडून चुकीचे उत्तर दिले गेले तरी त्यांना हसतखेळत योग्य माहिती देऊन बरोबर उत्तर वदवून घेऊनच त्यांच्याशी हात मिळवतात. मुलांवर स्वच्छतेचा संस्कार करण्याचे चांगले काम या आकर्षक मेस्कॉटव्दारे होत आहे.
भित्तीचित्रे, रोषणाई, रंगचित्रे, कारंजे अशा विविध माध्यमातून नवी मुंबईचे रूप अधिक आकर्षक होत असताना पथनाट्य, नृत्यनाट्य, फ्लॅश मॉब अशा वेगळ्या उपक्रमांतून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. यामध्ये नागरिकांचे व त्यातही मुलांचे आकर्षण ठरणा-या हिरव्या व निळ्या कचरापेट्यांच्या स्वरूपातील मेस्कॉट लक्षवेधी ठरत आहेत.
Published on : 08-02-2021 11:23:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update