क्यू आर कोड स्कॅनींग प्रणालीव्दारे नागरिक नोंदवू शकतात शौचालय व्यवस्थेबाबत अभिप्राय
.jpeg)

नवी मुंबई महानगरपालिकेस हागणदारीमुक्त शहराचे ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झाले असून आता स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने त्यापुढील 'वॉटर प्लस' मानांकनाकडे वाटचाल सुरु आहे. यामध्ये शौचालय सुविधेची उपलब्धता व स्वच्छता हा महत्वाचा भाग असून याकरिता प्रत्येक शौचालयात अभिप्राय / सूचना देण्यासाठी वेंडींग मशीन बसविण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये *आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शौचालयांमध्ये अभिप्रायात्मक क्यू आर कोड स्कॅनिंग प्रणाली बसविण्यात आलेली आहे. अशाप्रकारे शौचालय व्यवस्थेच्या अभिप्रायाकरिता वापरण्यास अत्यंत सुलभ व सोपी अशी अत्याधुनिक प्रणाली राबविणारी नवी मुंबई ही अग्रणी महानगरपालिका आहे.*
कोणत्याही नागरिकाने महानगरपालिकेच्या शौचालयाचा वापर केल्यानंतर त्याबद्दल अभिप्राय / सूचना द्यावयाच्या असतील तर त्याने आपल्या मोबाईल फोनमधील क्यू आर कोड स्कॅनरवर शौचालयामध्ये प्रदर्शित केलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे. स्कॅनीगनंतर त्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप मध्ये ओपन होणा-या लिंकवर Sent पर्याय निवडल्यानंतर फिडबॅकमध्ये शौचालय व्यवस्थेबद्दल ऑटोमॅटीक प्रश्न विचारला जातो. त्यावर योग्य पर्यायाव्दारे आपण आपला अभिप्राय सहजपणे नोंदवू शकतो. अभिप्रायाची ही पध्दत अत्यंत जलद आणि सुरक्षित असून याचा उपयोग नागरिकांकडून आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला दिसत आहे.
*महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी वाशी व तुर्भे विभागातील अनपेक्षित पाहणी दौ-यांप्रसंगी काही शौचालयांना भेट देत त्याठिकाणी क्यू आर कोड स्कॅनींग प्रणाली कार्यान्वित आहे किंवा नाही याबद्दलची तपासणी केली.*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5700 हून अधिक शौचकुपांची सुविधा असून सामुदायिक, सार्वजनिक तसेच इ-टॉयलेट व she-टॉयलेट स्वरुपात स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही सर्व स्वच्छतागृहे गुगल मॅपवर उपलब्ध असून त्यांचे ठिकाण गुगलव्दारे सहज शोधता येते. याचा उपयोग नवी मुंबईकर नागरिक तसेच शहरातून प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात केला जातो.
या शौचालयांतील सुविधा व व्यवस्थेबाबत अभिप्राय / सूचना देण्यासाठी वेंडींग मशिन सोबतच आता क्यू आर कोड स्कॅनींग प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली असून नागरिकांना एका क्लिकवर सहजपणे आपले स्वच्छतागृहांबाबतचे अभिप्राय नोंदविणे शक्य झाले आहे.
Published on : 05-03-2021 13:53:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update