* नेरुळ व बेलापूर विभागात आयुक्तांचा स्वच्छता पाहणी दौरा*
नवी मुंबईतील दैनंदिन शहर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करताना सिडको विकसित नागरी भागाप्रमाणेच गांवठाण व झोपडपट्टी भागातील स्वच्छतेकडेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बारकाईने लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर विविध विभागांना सकाळी लवकर भेटी देऊन ठिकठिकाणच्या स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत.
अशाच प्रकारे आयुक्तांनी आज बेलापूर विभागातील बेलापूरगांव, शाहाबाज गांव, दिवाळेगांव, सेक्टर 15, सेक्टर 50, सेक्टर 48, सेक्टर 46, करावेगांव परिसर येथील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच नेरुळ विभागात नेरुळगांव, सेक्टर 28, कुकशेत गांव, सेक्टर 3 व 4, सेक्टर 23 व 25 जुईनगर, शिरवणेगांव, सेक्टर 1 मार्केट, डी.वाय.पाटील विद्यापीठ परिसर याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्वच्छता सुधारणेच्या दृष्टीने प्रशासन व परिमंडळ 1 विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांचेमार्फत संबंधितांना महत्वाच्या सूचना केल्या.
विविध विभागांच्या पाहणी दौ-यांमध्ये रस्त्यांच्या कडेला घनमाती / डेब्रीज पडल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी डेब्रीज भरारी पथकाने अधिक प्रभावीपणे व बारकाईने काम करण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व पाडकाम कचरा (सी ॲण्ड डी वेस्ट) याची योग्य रितीने विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. आपले नवी मुंबई शहर डेब्रीजमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहयोगाची अत्यंत गरज असून नागरिकांमार्फत कोणत्याही प्रकारची घनमाती / डेब्रीज निर्माण होत असल्यास त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या मे. एस.जे.एम.ए. इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रा. लि. यांचेशी 9967913682 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास घनमाती/डेब्रिजची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे सोपे होणार आहे. याकरिता महानगरपालिकेने दरही निश्चित केले असून नवी मुंबई शहराचे सौंदर्य घनमाती / डेब्रीज टाकून बिघडू न देता नागरिकांनी आपल्या घनमाती / डेब्रीजची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडे द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जे नागरिक / संस्था कुठेही सार्वजनिक ठिकाणी घनमाती / डेब्रीज टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे तसेच स्वच्छताप्रेमी जागरूक नागरिकांनी असे कोणी करत असेल तर त्यांना शहर अस्वच्छ करण्यापासून परावृ्त्त करावे अथवा महानगरपालिकेस 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर त्याबाबत माहिती द्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला सामोरे जाताना मागील वर्षी देशातील तृतीय क्रमांक उंचावून या वर्षी देशात प्रथम क्रमांकाचा निर्धार नवी मुंबई महानगरपालिकेने केला असून त्या दृष्टीने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ठिकठिकाणी भित्तीचित्रांनी रंगलेल्या आकर्षक भिंती, उड्डाणपूल, अंडरपास तसेच चौकाचौकांचे सुशोभिकरण करून तेथे उभारलेल्या शिल्पाकृती, विद्युत रोषणाई अशा विविध प्रकारे नवी मुंबईचे रुप बदललेले दिसत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या स्वच्छता कार्यात नागरिकांचा नेहमीप्रमाणेच चांगला सहयोग मिळत असून तो सतत वाढत राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्यामुळे शहरात अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 16-03-2021 12:51:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update