*तुर्भे येथील एक्पोर्ट हाऊस मध्ये 'जम्बो कोव्हीड लसीकरण सेंटर' उद्यापासून कार्यान्वित*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या 22 रूग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे तसेच 15 खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड 19 लसीकरण केले जात असून 18 मार्चपर्यंत 59494 लाभार्थी नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
लसीकरणासाठी नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध व्हावी याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे विशेष लक्ष असून नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळी लस घेता यावी याकरिता महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली या तिन्ही रूग्णालयांमध्ये अहोरात्र 24 तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे, 18 नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठीही 1 दिवस वाढवून आता सोमवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार असे 4 दिवस लसीकरण करण्यात येत आहे.
यामध्ये अधिक वाढ करीत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उद्या 20 मार्चपासून तुर्भे सेक्टर 19 येथील एक्स्पोर्ट हाऊसमध्ये 'जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र' सुरू होत आहे. याठिकाणी 15 बुथ टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन असून उद्यापासून पहिल्या टप्प्यात 2 शिफ्टमध्ये 4 - 4 असे 8 बुथ कार्यरत होणार आहेत. 12 तास कार्यरत असणा-या या जम्बो लसीकरण केंद्रामध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत 4 बुथ तसेच दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत 4 बुथ लसीकरणासाठी सज्ज असणार आहेत.
प्रत्येक बुथवर प्रतिदिवस प्रतिबुथ 100 लाभार्थी अपेक्षित असून उद्या एक्पोर्ट हाऊस मधील जम्बो कोव्हीड लसीकरण केंद्राच्या एकाच ठिकाणी 800 लाभार्थ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. या जम्बो लसीकरण केंद्रामुळे नवी मुंबईतील लसीकरण प्रक्रियेला आणखी वेग मिळणार आहे व नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
Published on : 22-03-2021 14:13:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update