कोव्हीड लसीकरणासाठी प्रोत्साहित करणा-या आशा स्वयंसेविकांना आता प्रति लाभार्थी 10 रुपये विशेष भत्ता


नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लसीकरणाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून 34 लसीकरण केंद्रेवर कार्यान्वित करण्यात आली आहेत तसेच लसींच्या उपलब्धतेनुसार आणखी 50 लसीकरण केंद्र सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 31 जुलै पर्यंत 45 वर्षावरील सर्व नवी मुंबईकर नागरिकांना कोव्हीड लसीचा किमान 1 डोस दिला जावा अशाप्रकारे कार्यवाही करण्यात येत आहे.
या अनुषंगाने 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे जलद लसीकरण व्हावे याकरिता नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात आरोग्य विषयक माहिती प्रसारित करण्याचे काम करणा-या आशा स्वयंसेविकांवर 45 वर्षावरील जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्याची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अशाप्रकारचा आदेश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आला असून या कामाकरिता आशा स्वयंसेविकांना प्रति लाभार्थी, प्रति डोस रु.10/- इतका प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्याप्रमाणे एन.एच.एफ.एस. - 5 च्या अहवालानुसार एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के इतकी 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची सर्वसाधारणपणे संख्या असते. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यमान 15 लक्ष लोकसंख्या गृहीत धरल्यास 4.5 लक्ष इतकी 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या होईल. या सर्व लाभार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन आता आशा स्वयंसेविका 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत व प्रवृत्त करणार आहेत.
आता आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत लसीकरणाची योग्य माहिती पोहचविली जाणार आहे व लसीकरणासाठी प्रोत्साहीत करून लसीकरण करून घेतल्याबद्दल आशा स्वयंसेविकांना प्रति लाभार्थी रु. 10/- इतका विशेष भत्ता मिळून त्यांचे आर्थिक सक्षमीकरणही होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड लसीकरणाला गतीमानता प्राप्त करून देणारा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा हा निर्णय नागरिकांना व आशा स्वयंसेविकांना दिलासा देणारा आहे.
Published on : 11-06-2021 13:10:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update