*उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणा-या विद्यार्थ्यांसाठी तिस-यांदा आयोजित* *विशेष लसीकरण सत्राचा 27 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ*
कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज तिस-यांदा आयोजित करण्यात आलेल्या विशेष लसीकरण सत्राचा लाभ 27 विद्यार्थ्यांनी घेतला. यापूर्वी दोन वेळा आयोजित सत्रात 31 मे रोजी 252 व 3 जून रोजी 67 अशा 319 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले होती.
तरीही या 2 दिवशी आयोजित लसीकरण सत्राला काही कारणामुळे उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांकडून आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्याकडे आणखी एक सत्र आयोजित करण्याची विनंती केली जात होती. त्यानुसार या विशेष लसीकरण सत्राचे नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ 27 उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी घेतला आणि आमच्या शिक्षणाची काळजी घेतल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींचे 17 जूनला 3 रूग्णालयांत मोफत लसीकरण *
दिव्यांग व्यक्तींना कोव्हीड लसीकरणाव्दारे संरक्षित करण्याची गरज लक्षात घेत यापूर्वी 10 जून रोजी घोषित करण्यात येऊन अतिवृष्टीच्या इशा-यामुळे पुढे ढकलण्यात आलेले 18 ते 44 वर्षावरील दिव्यांगांसाठीचे विशेष लसीकरण सत्र गुरुवार, दिनांक 17 जून 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9 ते 5 या वेळेत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 नेरुळ, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर 3 ऐरोली व इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर 5 वाशी अशा 3 ठिकाणी दिव्यांगांकरिता हे विशेष लसीकरण सत्र 17 जून रोजी संपन्न होणार असून 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींनी 3 ठिकाणी आयोजित केलेल्या या विशेष लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*22 नवीन केंद्रांमध्ये पहिल्याच दिवशी 45 वर्षावरील 561 नागरिकांचे लसीकरण*
सध्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळ लस घेता यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध भागांमध्ये नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 22 शाळांमध्ये आजपासून नवीन लसीकरण केंद्रे कार्यान्वित झाली असून आज पहिल्याच दिवशी या 22 लसीकरण केंद्रांवर 45 वर्षावरील 561 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
संभाव्या तिस-या लाटेपूर्वी 45 वर्षावरील नागरिकांचा किमान एक डोस दिला जावा याकरिता महानगरपालिका लसीकरणाला गती देण्याचा विविध माध्यमांतून प्रयत्न करीत असून नागरिकांना सहजपणे लस उपलब्ध व्हावी याकरिता आधीच्या 34 लसीकरण केंद्रांमध्ये 22 नवीन केंद्रांची वाढही करण्यात आलेली आहे. तसेच लसीच्या उपलब्धतेनुसार आणखी लसीकरण केंद्रांचे वाढ करण्याचे नियोजन आहे.
तरी 45 वर्षांवरील नवी मुंबईकर नागरिकांनी आरोग्य जपणुकीच्या दृष्टीने कोव्हीड लसीकरणाचे महत्व लक्षात घेऊन संपूर्णत: सुरक्षित असलेल्या कोव्हीड लसीचा डोस आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन घ्यावा व स्वत:ला संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-06-2021 15:38:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update