नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांकरिता 3 वेळा विशेष लसीकरण सत्रे राबविण्यात आलेली आहेत. याशिवाय परदेशात शिक्षण, नोकरी तसेच टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्याकरिता कोव्हीशील्ड लसीचा दुसरा डोस आवश्यक असल्याने 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्याबाबत विचारणा करण्यात येत आहे. या अनुषंगाने शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्यानुसार परदेशी विद्यपीठात शिक्षण, परदेशात नोकरी तसेच टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारे ॲथलीट, खेळाडू व संबंधित स्टाफ यांना लसीचा दुसरा डोस पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर दिला जाणार आहे.
याकरिता संबंधितांनी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याची आवश्यक कागदपत्रे, परदेशात नोकरी मिळत असल्याबाबतची कागदपत्रे तसेच टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याकरिता प्राप्त नामनिर्देशनपत्र सादर करणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात तिस-या मजल्यावर आरोग्य विभागामध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून संबंधितांनी दुपारी 2 ते 6 या वेळेत याठिकाणी आपली कागदपत्रे दाखवून लसीच्या दुस-या डोसची परवानगी प्राप्त करून घ्यावयाची आहे.
सदर लसीकरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15 नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात जाऊन करून घ्यावयाचे असून शिक्षण, नोकरी अशा महत्वाच्या कामांसाठी तसेच टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याकरिता परदेशी जाणा-या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी याचा लाभ संबंधितांनी करून घ्यावा असे आवाहन केले आहे.