*पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स म्हणून 136 पेट्रोल पंप कर्मचा-यांचेही कोव्हीड लसीकरण*
*दैनंदिन कामकाज करताना ज्यांचा मोठ्या प्रमाणावर जनतेशी संपर्क येतो अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींना कोव्हीड लसीचे संरक्षण मिळावे यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आज पेट्रोल पंपावर काम करणा-या कर्मचा-यांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली या तीन रूग्णालयात आयोजित विेशेष लसीकरण सत्राचा नवी मुंबईतील पेट्रोल पंपावर काम करणा-या 136 कर्मचा-यांनी घेतला.*
यामध्ये सेक्टर 10 ए वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात 53, नेरूळ सेक्टर 15 येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात 48 तसेच सेक्टर 3 ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रूग्णालयात 35 अशा एकूण 136 पेट्रोल पंप कर्मचा-यांनी विशेष लसीकरण सत्रात कोव्हीडची लस घेतली.
त्याचप्रमाणे उर्वरित सोसायटी वॉचमनकरिता आजही तिन्ही महापालिका रूग्णालयात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वाशी येथे 57, नेरूळ येथे 60 व ऐरोली येथे 32 अशाप्रकारे एकूण 149 सोसायटी वॉचमन यांचे कोव्हीड 19 लसीकरण करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून समाजातील कोणताही घटक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांवरील निराधार बेघर, तृतीयपंथी व्यक्तींप्रमाणेच कॉरी क्षेत्र, रेडलाईट एरिया या ठिकाणी जाऊन विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच केमिस्ट, मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर याठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच रिक्षा - टॅक्सी चालक, सोसायट्यांच्या वॉचमन अशा नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येणा-या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता (Potential Superspreaders) विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये आज पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले असून अशाच प्रकारे इतरही घटकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तरी लाभार्थी नागरिकांनी लसीची उपलब्धता होईल तसे लगेच लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाल्यानंतरही मास्क, सुरक्षित अंतर, सतत हात धुणे या कोव्हीड सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 14-07-2021 15:11:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update