*लेखा विभागाकरीता विशेष कार्यालयीन कामकाज प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न*
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांचे कार्यालयीन कामकाजातील ज्ञान अद्ययावत व्हावे यादृष्टीने राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत वन प्रशिक्षण संस्था, शहापूर यांच्या सहयोगाने विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये लेखा विभागातील अधिकारी, कर्मचा-यांसाठी 2 दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी मनोगत व्यक्त करताना या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाज सुधारणेत व्हावा तसेच प्रशिक्षणातून घेतलेले ज्ञान आपल्या सहका-यांनाही द्यावे असे सांगितले. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, वन प्रशिक्षण संस्था शहापूर यांच्या उपसंचालक श्रीम. गीता पवार, व्याख्याते सेवानिवृत्त सहाय्यक संचालक श्री. एस.जी.पारधी उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये 'महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981' तसेच 'सेवेच्या सर्वसाधारण शर्ती व सेवा अभिलेख' त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम, शिस्त व अपिल' या विषयांवर पहिल्या दिवशी 3 सत्रांमध्ये सेवानिवृत्त वरिष्ठ लेखा अधिकारी श्री. जी.टी.महाजन यांनी मौलिक मार्गदर्शन केले व उपस्थित प्रशिक्षणार्थी अधिकारी, कर्मचारीवृंदाशी संवाद साधत 'समस्या निराकरण व सर्जनशीलता' या विषयावर संवाद साधला. प्रशिक्षणाच्या दुस-या दिवशी 'ताणतणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सरकारी कर्मचारी यांचे व्यक्तिमत्व' या विषयी श्री. प्रकाश मोहिते तसेच 'खरेदी प्रक्रिया', 'मोजमाप पुस्तिका अभिलेख' आणि 'वैद्यकीय देयकांची परिपूर्ती' या तीन विषयांवर श्री. एस.जी.पारधी यांनी माहितीपूर्ण व्याख्याने दिली.
प्रशिक्षणामध्ये आलेले अनुभव व प्रशिक्षणामुळे झालेला लाभ याविषयी प्रशिक्षणार्थींपैकी लेखा विभागातील अधिकारी श्री. शिवाजी चव्हाण, श्रीम. सुनिता अहिरे, श्री. सुधीर दिनकर यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी अशाच प्रकारची सत्रे यापुढील काळातही आयोजित केली जाणार असून दि. 27 व 28 सप्टेंबर रोजी अभियांत्रिकी, नगररचना व 8 विभाग कार्यालये येथील कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांचे करीता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.
Published on : 24-09-2021 14:44:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update