*कोव्हिशील्ड लसीचा खाजगी केंद्रावर पहिला डोस घेणा-यांना महापालिका केंद्रात दुसरा डोस विनामूल्य घेण्याची संधी* *आधारकार्ड नसलेल्या नागरिकांसाठी 12 ऑक्टोबर रोजी ऐरोली व नेरुळ रुग्णालयात विशेष लसीकरण सत्र*
*नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लसीकरणाला गती दिली जात असताना 18 वर्षावरील एकही लाभार्थी नागरिक लसीकरणापासून वंचीत राहू नये याची दक्षता घेतली जात आहे. या अनुषंगाने आधारकार्ड नसलेल्या नागरिकांसाठीही माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ व राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली येथील महापालिका रुग्णालयात लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ 93 नागरिकांनी घेतला होता.
अशाचप्रकारे आधारकार्ड नसलेल्या उर्वरित नागरिकांसाठी उद्या दि. 12 ऑक्टोबर रोजी नेरुळ व ऐरोली या दोन्ही रुग्णालयांत सकाळी 9 ते 5 या वेळेत विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांनी कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस खाजगी रुग्णालय, कंपनी अथवा सोसायटी याठिकाणी घेतला असेल आणि पहिला डोस घेऊन ज्यांचे 84 दिवस पूर्ण झाले असतील असे नागरिक नवी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केद्रांवर कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस विनामूल्य घेऊ शकतात. तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन कोव्हीड 19 लस घेऊन संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-10-2021 15:58:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update