*'स्वच्छ सर्वेक्षण' व 'माझी वसुंधरा' अभियानातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासन आणि* *'सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज' मध्ये केंद्र सरकार यांचेमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेस* *43 कोटी भरघोस रक्कमेचा पारितोषिक निधी*
*महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस यापूर्वीच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राष्ट्रीय पातळीवर संपादन केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रू.30 कोटी पारितोषिक रक्कम मिळणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात रु.15 कोटी रक्कमेचा पारितोषिक स्वरुपातील निधी प्राप्त झाला आहे व 15 कोटी रक्कम काही कालावधीत प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात व्दितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनामार्फत रू. 7 कोटी पारितोषिक रक्कम आणि सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज मध्ये देशात व्दितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल रू. 6 कोटी पारितोषिक रक्कम प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे एकूण 43 कोटी इतक्या भरघोस रक्कमेचा पारितोषिक निधी नवी मुंबई महानगरपालिकेस लाभत असून यामधून शहर स्वच्छतेला अधिक गतीमानता मिळेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.*
सन 2002 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून व पुढे केंद्र सरकारच्या वतीने 2016 पासून स्वच्छ भारत मिशन सुरू झाल्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिकेने आपले स्वच्छतेचे मानांकन सतत उंचावत ठेवले आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखत जनसहभागातून नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवर सतत उंचावत राहिलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र शासनानेही नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले असून येथील स्वच्छता कार्याला प्रोत्साहक पारितोषिक रक्कम प्रदान केलेली आहे.
यावर्षीही नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ते 40 लक्ष लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून बहुमान पटकाविलेला असून ओडीएफ कॅटेगरीमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन, कचरामुक्त शहरांमध्ये सर्वोच्च 5 स्टार मानांकन तसेच या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रेरक दौड सन्मान कॅटेगरीमध्ये सर्वोच्च दिव्य (Platinum) मानांकन अशी तिन्ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च मानांकने नवी मुंबई महानगरपालिकेने संपादन केलेली आहेत. अशाप्रकारची सर्वोत्तम मानांकने संपादन करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर असून त्याबद्दलही महाराष्ट्र शासनामार्फत आगामी काळात पुरस्कार प्राप्त होणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणामधील पुरस्काराप्रमाणेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा अभियान' यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील व्दितीय क्रमांकाचे शहर म्हणून पारितोषिक प्राप्त ठरलेली असून त्याचीही पारितोषिक रक्कम रु.7 कोटी महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे.
याशिवाय सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले असून त्याचीही पारितोषिक रक्कम रु. 6 कोटी महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे.
*अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेस अभिनंदनपूर्वक रु. 43 कोटी इतकी पारितोषिक रक्कम प्राप्त झाली असून याव्यतिरिक्त यापुढील काळात आणखी पारितोषिक रक्कम प्राप्त होणार आहे.*
*नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या कामाची दखल राष्ट्रीय व राज्य पातळीवर घेण्यात आलेली असल्याने हा पारितोषिक स्वरूपातील सन्मान नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला सामोरे जाताना तसेच माझी वसुंधरा अभियानात आणखी वैशिष्टयपूर्ण कामे करण्यासाठी या पारितोषिक रक्कमेचा विनियोग केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे.*
Published on : 14-12-2021 08:06:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update