घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील कौलआळी शौचालया लगत, STP केंद्रासमोर, से.16, घणसोली येथे पहिल्या मजल्याचे आरसीसी बांधकाम प्रगतीपथावर होते तसेच अर्जूनवाडी रस्त्यालगत, अर्जूनवाडी, घणसोली याठिकाणी तळमजला आरसीसी कॉलमचे काम प्रगतीपथावर असल्याचे निदर्शनास आले होते. या दोघांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या दोन्ही अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-11, जेसीबी-1, ब्रेकर-2, गॅस कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशाप्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 20-12-2021 13:38:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update