*कोव्हीड रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी आयुक्तांचा नियोजनविषयक संवाद*
*नवी मुंबई महानगरपालिकेने लसीकरणात घेतलेली आघाडी आणि रूग्णसंख्या कमी असतानाही टेस्टींगचे कमी न केलेले प्रमाण ही कार्यवाही उत्तम रितीने सुरू असून मागील काही दिवसात रुग्णवाढ मोठया प्रमाणावर होत असताना दिसत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अल्प आहे ही समाधानकारक बाब आहे. मात्र कोव्हीड अजून संपलेला नाही त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत नवी मुंबई कोव्हीड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.*
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरीएन्टच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोना विषाणूचा मागील काही दिवसातील झपाटयाने झालेला प्रसार लक्षात घेत करावयाच्या नियोजनाविषयी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी वेब संवाद साधला. या वेबसंवादामध्ये नायर हॉस्पिटलचे मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉ़जिस्ट डॉ. उदय जाधव, भारतीय बालआरोग्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, फिजीशिअन डॉ. अजय कुकरेजा आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि महानगरपालिकेचे इतर वैदयकीय अधिकारी ऑनलाईन तसेच तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. प्रमोद पाटील समिती हे समिती सभागृहात उपस्थित राहून सहभागी झाले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड लसीचा पहिला डोस सर्वात आधी 100 टक्के पूर्ण केला असून 89 टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. ही अत्यंत चांगली बाब असल्याचे नमूद करीत दुस-या लाटेत आयसीयू बेडस व व्हेंटिलेटर्स कमतरतेचा अनुभव लक्षात घेउुन तिस-या लाटेची तयारी करताना महानगरपालिकेने त्यामध्ये मोठया प्रमाणावर वाढ केली ही उपयोगी गोष्ट असल्याचे टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी नमूद केले.
ओमायक्रॉनचा प्रसार झपाटयाने होत असल्याचे दिसत असले तरी रुग्ण गंभीरतेचे प्रमाण मर्यादीत असल्याचे आढळून येत असून ही समाधानकारक बाब असली तरी आगामी काळात हे चित्र बदलणार नाही याचा अंदाज आत्ताच बांधणे योग्य होणार नाही असे मत व्यक्त करीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.
शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार विलगीकरणाचा कालावधी 7 दिवसांचा असावा अशी सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे सहव्याधी (Comorbid) असणा-या 60 वर्षावरील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना तसेच मध्यम व गंभीर स्वरुपाची लक्षणे असणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना महानगरपालिकेच्या कोव्हींड केंद्रात अथवा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याची सूचना त्यांनी केली. यादृष्टीने तिस-या लाटेची पूर्वतयारी करताना कोव्हीड केंद्रांच्या संख्येत वाढ करून महानगरपालिकेने चांगले पाऊल उचलले असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या लक्षणेविरहीत कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णांची मोठया प्रमाणावर असल्याने गृह विलगीकरणावर भर दिला जात असून कन्टेनमेंट झोनचे योग्य रितीने पालन करण्यासाठी कन्टेनमेंट झोनच्या नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्यात याव्यात व त्यांचे सोसायटी, इमारती यांच्यामार्फत योग्य रितीने पालन होईल याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
*नवी मुंबई कोव्हीड टास्क फोर्स मधील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या महत्वपूर्ण सूचनांच्या अनुषंगाने विलगीकरणाविषयी शासनाच्या नवीन नियमावलीनुसार 7 दिवसांचा विलगीकरण कालावधी असणा-या मार्गदर्शक सूचना निर्गमीत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले. त्यामध्ये 60 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच मध्यम आणि गंभीर स्वरुपाची लक्षणे असणारे कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण यांना संस्थात्मक विलगीकरणात महानगरपालिकेची कोव्हीड केंद्रे अथवा रुग्णालये याठिकाणी उपचारार्थ दाखल करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या गरोदर महिला कोव्हीड पॉझिटिव्ह आहेत व ज्यांना मध्यम अथवा तीव्र स्वरुपाची लक्षणे जाणवत आहेत किंवा ज्यांचा प्रसूती दिनांक जवळ आलेला आहे अशा गरोदर महिलांनाही संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.*
*कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करताना वाढलेली रुग्ण संख्या व विलगीकरण कालावधीच्या नवीन शासकीय मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन कन्टेनमेंट झोनची अंमलबजावणी 7 दिवस कालावधीकरिता करावी असेही आयुक्तांनी आरोग्य विभाग व विभाग कार्यालयांना सूचीत केले.*
नवी मुंबई कोव्हीड टास्क फोर्स मधील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत कोव्हीडची आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यातील सदयस्थिती लक्षात घेऊन केलेल्या महत्वापूर्ण चर्चेमुळे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या कोव्हीड प्रतिबंधात्मक तसेच उपचार सुविधांच्या नियोजनाला सुयोग्य दिशा मिळते व याव्दारे नवी मुंबई शहरातील कोव्हीड नियंत्रण कामाला गतीमानता येते असे महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी वेबसंवादाची सांगता करताना विशेषत्वाने नमूद केले.
Published on : 07-01-2022 14:34:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update