*एपीएमसी मार्केटमध्ये कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन करण्याविषयी दक्षता घेण्याचे आयुक्तांचे निर्देश*
संपुर्ण एमएमआर क्षेत्राला कृषि माल व अन्नधान्य पुरवठा करणारी एपीएमसी मार्केट ही मोठी आशियातील सर्वात बाजारपेठ असून नवी मुंबई शहरातील कोव्हीड प्रसाराच्या दृष्टीने नेहमीच जोखमीचे क्षेत्र ठरली आहे. सध्या नमुंमपा क्षेत्रात दररोज अडीच हजाराहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी रितीने राबविण्यावर भर दिला जात आहे. एपीएमसी मार्केटमध्येही महानगरपालिकेमार्फत कोव्हीड नियमांचे पालनाकडे लक्ष ठेवण्यासाठी विशेष दक्षता पथके कार्यरत असून नियमांचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
*कोव्हीडचा वाढता प्रसार व ओमायक्रॉ़नचा धोका लक्षात घेता कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट मानल्या जाणा-या एपीएमसी प्रशासनाने आपल्या आवारात कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन होण्याबाबत दक्ष व्हावे या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी एपीएमसीचे सह सचिव श्री प्रकाश अष्टेकर व उप अभियंता श्री. मेहबूब बेपारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक प्रभावीपणे आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.*
नवी मुंबई महानगरपालिकेने एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये दिवस-रात्र कोव्हीड टेस्टींग केंद्रे सुरुवातीपासूनच कार्यरत ठेवली असून जास्तीत जास्त टेस्टींग करून कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एपीएमसी प्रशासनानेही तेथे येणा-या प्रत्येकाचे टेस्टींग होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
त्याचप्रमाणे मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे अशा महत्वाच्या सूचना दर अर्ध्या तासांनी सर्व मार्केट्समध्ये माइकींगव्दारे करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मास्क व इतर कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दररोज अधिक प्रभावीपणे दंडात्मक कारवाया करण्याचेही निर्देशित केले. याशिवाय कारवाईचा प्रभाव जाणवण्यासाठी आठवडयातून एक दिवस पूर्वसूचना न देता कारवाईचा मेगा ड्राईव्ह घेण्याची सूचना आयुक्तांनी केली.
एपीएमसी मार्केट मध्ये राज्यातील विविध जिल्हयातूनच नव्हे तर विविध राज्यातून शेतकरी, व्यापारी आपला माल घेऊन येतात. त्यामुळे व्यापा-यांप्रमाणेच इतर ठिकाणाहून आलेल्या गाडयांचे चालक, क्लिनर, मालवाहू कामगार यांचा मोठया प्रमाणावर राबता याठिकाणी असतो. या सर्वांची टेस्टींग केली जात असून त्यामध्ये पॉझिटिव्ह येणा-या व्यक्तींना एपीएमसी मार्केट क्षेत्रात असलेल्या महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करून घेण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाची टेस्टींग केली जात आहे याकडे एमपीएमसी प्रशासनाने लक्ष दयावे व टेस्टींगच्या ठिकाणी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यास महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दयावे. त्याची त्वरीत दखल घेत टेस्टींग करणारे समुह वाढविण्यात येतील असे आयुक्तांनी सूचित केले.
एपीएमसी मार्केट हे अत्यावश्यक सेवेत येते, त्यामुळे ते बंद करता येत नाही हे लक्षात घेतले तरी त्यामुळे कोव्हीड प्रसाराचा मोठा धोका आहे हे कायम लक्षात ठेवून कोव्हीड प्रतिंबंधात्मक आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात व कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाईचे धोरण अधिक गंभीरपणे राबवावे असे महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्यामार्फत एपीएमसी प्रशासनाला सूचीत करण्यात आले.
Published on : 11-01-2022 11:56:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update