सीबीएसई शाळांतील नर्सरीच्या वर्गासाटी प्रवेश प्रक्रिया सुरू
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर-11 व नेरूळ सेकटर-50 या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु करण्यात आल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शाळांमध्ये सन 2022-23 मधील नर्सरी वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून येथील प्रवेश पूर्णत: नि:शुल्क असल्याने या सुविधांचा लाभ सर्वाधिक पालकांनी घ्यावा याकरीता महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
या प्रत्येक शाळेमध्ये 120 विदयार्थ्यांना नर्सरीच्या वर्गात प्रवेश उपलब्ध असून प्रवेशाकरीता 31 डिसेंबर 2022 रोजी विदयार्थ्यांचे वय 3 वर्षे पूर्ण असले पाहिजे. प्रवेश घेण्यासाठी पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या शाळांमध्ये प्रवेशाकरीता नि:शुल्क प्रवेश अर्ज दिनांक 09 मार्च 2022 पर्यंत सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. पालकांनी सदर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 10/03/2022 पर्यंत संबंधित शाळेत सादर करावे.
या शाळांकरिता सुसज्ज इमारती असून प्रशिक्षित शिक्षक तसेच नि:शुल्क शैक्षणिक साहित्य आदी सुविधा पुरविल्या जात आहेत. प्रवेशासाठी शाळेपासून 1 कि.मी. च्या आतील अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देणेत येणार आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी विद्यार्थ्याचे वय 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास नियुक्तीसाठी लॉटरी पध्दत अवलंबविण्यात येणार आहे. हे शिक्षण नि:शुल्क असून बस सेवा उपलब्ध असणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. शाळा प्रवेशाचे सर्व अधिकार महापालिका आयुक्त यांचे असणार आहेत.
तरी सीबीएसई बोर्डाशी संलग्न 2 शाळांमधील नर्सरी प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांनी संबंधित शाळेत पूरक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-02-2022 06:20:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update