आता जनजागृती करीत नवी मुंबईत फिरणार "स्वच्छता प्रचार रथ"
स्वच्छता ही नियमित करण्याची बाब असल्याने शहर स्वच्छतेचे महत्व नागरिकांच्या मनावर बिंबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांपर्यंत थेट पोहचणा-या स्वच्छता प्रचार रथाची निर्मिती करण्यात आली असून अत्यंत अद्ययावत असे दोन प्रचार रथ नवी मुंबई शहरात वर्दळीच्या ठिकाणी थांबून संदेश, जिंगल्स्, लघुपट याव्दारे स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत.
महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या मार्गदशनाखाली या प्रचार रथांची निर्मिती करण्यात आली असून अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले तसेच मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ बाबासाहेब राजळे आणि क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. मनोजकुमार महाले व कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत या दोन्ही प्रचाररथांना स्वच्छता जनजागृतीसाठी महापालिका मुख्यालयातून निर्गमीत करण्यात आले.
या प्रचाररथ वाहनांमध्ये दोन्ही बाजूनी पहाता येतील अशा प्रकारे एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या असून त्यामुळे वाहनाच्या दोन्ही बाजूच्या लोकांना स्क्रिनवरील मजकूर, लघुचित्रपट पाहता येणार आहेत. या प्रचार रथांना नागरिकांचा ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून प्रचार रथाचा जनजागृतीचा उददेश सफल होत असताना दिसत आहे.
Published on : 03-03-2022 06:10:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update