घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील घणसोली विभागांतर्गत सत्यवान नगर रबाळे तलाव परिसर गोठिवली, नवी मुंबई याठिकाणी प्रगतीपथावर असलेले आरसीसी तळमजला + दोन मजल्याचे बांधकाम त्याचप्रमाणे रबाळे स्मशानभूमीच्या मागे रबाळे याठिकाणी दोन मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते. या दोन्ही बांधकामधारकांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामांस घणसोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवले होते.
त्यानुसार या अनधिकृत बांधकामांवर घणसोली विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 10 मजुर, 03 ब्रेकर, 1 गॅस कटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 03-03-2022 06:13:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update