*शहर स्वच्छतेत अधिक सुधारणा करण्यासाठी स्वयंपरीक्षण करण्याचे आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचे निर्देश*
*नवी मुंबई हे स्वच्छतेबाबत मोठ्या क्षमता असणारे शहर असल्याने विविध स्तरांतून सर्वोत्तम गुणवत्तेची नेहमीच अपेक्षा केली जाते. त्यादृष्टीने आपण अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज असून स्वच्छतेच्या निकषांबाबत कोणताही निष्काळजीपणा अपेक्षित नाही व तो चालणार नाही असे स्पष्ट करीत स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या परीक्षणाला सुरूवात होण्याच्या उंबरठ्यावर असताना अधिक काटेकोर राहून देशातील प्रथम क्रमांकाचे मानांकन संपादन करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज रहा असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्वच्छताविषयक आढावा बैठकीप्रसंगी दिले.*
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, प्रशासन व परिमंडळ 1 विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इतर नोडल अधिकारी, कार्यकारी अभियंता व सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांमार्फत घरांमध्येच ओला, सुका व घरगुती घातक असा कचरा वेगवेगळा ठेवला जाणे व महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देणे अनिवार्य आहे. ज्या भागात अद्यापही कचरा वर्गीकरणामध्ये काही कमतरता आहेत त्याठिकाणी नागरिकांपर्यंत पोहचून अधिक प्रभावीपणे काम करावे असे आयुक्तांनी निर्देश दिले. कचरा वर्गीकरणाचे प्रमाण तपासतानाच कचरा गाड्यांमधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जाणारा कचरा तीन प्रकारे वर्गीकृत असतो याविषयीदेखील खातरजमा करण्याचे तसेच कचरा गाड्यांनुसार त्याबाबतची आकडेवारी आपल्याकडे नियमित सादर करण्याचे आयुक्तांनी आदेशीत केले.
मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होत असलेल्या सोसायट्या, संस्था अशा ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार राबविले जात असलेले ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नियमितपणे कार्यान्वित असल्याबाबतचीही खातरजमा करून घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी केले.
ज्या व्यावसायिक भागामध्ये दिवसातून दोन वेळा रस्ते सफाई केली जाते त्या ठिकाणी त्याबाबतच्या माहितीचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावले असल्याची खातरजमा करून घ्यावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबईतील तलावांसारख्या जलस्त्रोतांच्या ठिकाणी जलाशयाच्या पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारचा कचरा तरंगता राहणार नाही याबाबत सुरु केलेली कार्यवाही नियमितपणे सुरु असल्याची खात्री करून घ्यावी व त्यावर दैनंदिन काटेकोरपणे लक्ष ठेवावे असे निर्देश आयुक्तांनी दिले.
*शहरात महानगरपालिकेमार्फत केली जाणारी बांधकामे तसेच नागरिकांमार्फत होत असलेली बांधकामे यांचा बांधकाम व पाडकाम कचरा अर्थात डेब्रीज नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कार्यान्वित असलेल्या सी अँड वेस्ट प्लान्टवर नेऊन प्रक्रिया करण्याबाबत कार्यवाही करणे तसेच नागरिकांना याची माहिती मिळावी याकरिता तशा प्रकारची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले.*
कच-याचे निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्याप्रमाणेच त्यामधील ओल्या कच-यावर खत टोपलीसारख्या प्रभावी साधनाचा वापर करून घरातच ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी पुढाकार घ्यावा यादृष्टीने नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत विभागीय पातळीवर प्रभावीपणे मोहीम राबवावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
*सार्वजनिक व सामुदायिक शौचालये हा शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग असून दिवसातील कोणत्याही वेळी ती स्वच्छच राहतील तसेच विशेषत्वाने जास्त प्रमाणात वापर होतो सकाळच्या वर्दळीच्या वेळी ती सतत स्वच्छ राहण्यासाठी तेथील केअर टेकरने अतिशय सतर्कतेन तिथे उभे राहून काम करावे असे निर्देश शौचालय ठेकेदारांना द्यावेत असेही आयुक्तांनी आदेशीत केले. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दूर्लक्षित केला जाणार नाही असे आयुक्तांमार्फत स्पष्ट करण्यात आले.*
शहरात व्यापक प्रमाणात झालेल्या सुशोभिकरण कामांमुळे शहराचे रूप बदलले असल्याचे चांगले अभिप्राय नागरिकांकडून व प्रवाशांकडून प्राप्त होत असून त्या कामांना अंतिमत: वेग द्यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले. सुशोभिकरण कामांमध्ये झोपडपट्टी व गावठाण भागांमध्ये झालेल्या सुशोभिकरणाबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून तेथील सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. 111 प्रभागात उभारण्यात येत असलेल्या विविध डिझाईनच्या आकर्षक कारंजांमध्ये मलप्रक्रिया केंद्रांतील प्रक्रियाकृत पाणीच वापरले जात असल्याची व तसे फलक कारंज्याच्या बाजूला प्रदर्शित केले गेले असल्याची खातरजमा करून घ्यावी अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक दुकानाच्या बाहेर दुकानदाराने कच-याचे डबे ठेवणे बंधनकारक असून तशा प्रकारची खात्री विभाग अधिकारी यांनी करून घ्यावी व या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी असेही आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्देशित केले.
रस्ते सफाई प्रमाणेच विशेषत: मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांमधील साफसफाईकडेही नियमितपणे लक्ष दिले जावे असे निर्देश देतानाच नागरिकांनीही वाहनातून जाताना वा चालताना दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात टाकला जाणा-या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स यासारखा कचरा टाकू नये याविषयी अधिक जनजागृती करावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
*स्वच्छ सर्वेक्षणाचे केंद्रीय स्तरावरून होणारे परीक्षण पूर्वसूचना न देता कधीही होणार असल्याने आपण दक्ष राहण्याची गरज असून केंद्रीय परीक्षणापूर्वी स्वयंपरीक्षण करणे महत्वाचे आहे. त्याकरिता स्वच्छ सर्वेक्षणामधील 14 मुद्दयांच्या अनुषंगाने बनविण्यात आलेल्या चेकलिस्टनुसार कार्यवाही होत असल्याबाबतची दैनंदिन तपासणी करावी व त्यामध्ये जाणवणा-या त्रुटींबाबत तातडीने संबंधीत अधिका-यांना माहिती द्यावी व त्यामध्ये त्वरित सुधारणा करून घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.*
विभाग कार्यालय पातळीवर तसेच मुख्यालय पातळीवरून स्वच्छतेशी निगडीत बाबींची अधिकारी, कर्मचारीनिहाय जबाबदारी द्यावी व त्याचे पालन होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
*लक्ष दिले नाही तर आजच्या स्वच्छतेचे रूपांतर अस्वच्छतेत व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वच्छतेविषयी कायमस्वरूपी दक्ष राहण्याची गरज असून त्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करणे हे आपले एकमेव ध्येय असले पाहिजे. त्यादृष्टीने अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार अशा प्रत्येक घटकाने सतर्कतेने काम करणे गरजेचे आहे. यामध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याकरिता नागरिकांशी विविध माध्यमांतून सतत संवादी राहणे आवश्यक आहे. नागरिकांकडून स्वच्छतेबाबत असलेल्या अपेक्षा या त्यांच्यापर्यंत थेट पोहचवून शहर स्वच्छतेत त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे काम करावे असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले.*
Published on : 09-03-2022 13:51:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update