*रामनगर दिघा येथील बोरला तलावाचा आकर्षक कायापालट*
21 व्या शतकातले सुनियोजित शहर, स्वच्छ शहर, स्मार्ट शहर, उदयानांचे शहर अशा विविध संबोधनांनी नावाजले जाणारे नवी मुंबई शहर हे “तलावांचे शहर“ म्हणूनही ओळखले जाते. शहराच्या विविध भागात असणारे 24 तलाव नवी मुंबईच्या पर्यावरणशीलतेमध्ये लक्षणीय भर घालताना दिसतात.
नवी मुंबई महानगरपालिका स्व्चछ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने तलाव स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत असून महापालिका श्री अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार तलावांच्या जलाशयावर कोणत्याही प्रकारचा कचरा तरंगता दिसू नये याची खबरदारी घेतली जात आहे.
यामधील एक रामनगर, दिघा परिसरात असलेला बोरला तलाव. हा तलाव मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. तलावाच्या जलाशयात अनिर्बंध वाढलेल्या पाणवनस्पतींमुळे तसेच तलावामध्ये मोठया प्रमाणावर बांधकामाचे डेब्रीज टाकले गेल्यामुळे या तलावाची पूर्णत: दूरवस्था झाली होती. तलावाचे नुतनीकरण करण्याबाबत स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने मागणी केली जात होती. तथापि या तलावाची साफसफाई करण्यासाठी तिथपर्यंत पोहचण्याकरिता अत्यांत अरुंद जागा असल्यामुळे तलावातील गाळ काढणे व तलाव स्वच्छ करणे अतिशय अडचणीचे होते.
या अनुषंगाने तलावाची सुधारणा करण्यासाठी तलावाशेजारी असलेल्या मुकंद आयर्न कंपनीकडे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मागणी व सातत्याने पाठपुरावा करुन कंपनीच्या हददीतून तलावापर्यंत रस्ता काढण्यात आला. याव्दारे बोरला तलावाच्या काठापर्यंत पोहचून तलावातील गाळ काढण्याचे व तलाव सुधारण्याचे काम हाती घेतले.
7107 चौ.मी. क्षेत्रफळाच्या बोरला तलावाची दूरवस्था दूर करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली व सन 2021 च्या मे महिन्यापासून बोरला तलावातील गाळ काढणे व सुधारणा कामाला नियोजनबध्द रितीने सुरूवात करण्यात आली.
बोरला तलाव सुशोभिकरणांतर्गत तलावाभोवती 370 मीटरचा जॉगीग ट्रॅक बनविण्यात आला असून याव्दारे नागरिकांना सकाळ - संध्याकाळ फेरफटका मारण्याची तसेच आरोग्यहिताच्या दृष्टीने चालण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे.
त्याचप्रमाणे तलावातील गाळ काढणे व 320 मीटर भिंत बांधणे, 320 मीटर पिचींग करणे, 320 मीटर टो – वॉल बांधणे अशी स्थापत्यविषयक कामे हाती घेण्यात आली आहेत.
साधारणत: 6 मीटर इतकी खोली असलेला बोरला तलाव नागरिकांसाठी विरंगुळयाचे उत्तम ठिकाण म्हणून विकसित करण्यात येत असून तलावाभोवती नागरिंकांना बसण्यासाठी बेंचेस लावण्यात येत आहेत तसेच नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओपन जीमचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
अतिशय अस्वच्छ व दूरवस्थेत गेलेल्या बोरला तलावाचे गाळ काढून सुशोभिकरण केल्यामुळे तलावाचा आकर्षक कायापालट झाला असून रामनगर दिघा परिसरातील नागरिक विरंगुळयाचे आकर्षक ठिकाण विकसीत झाल्याबदल आनंद व्यक्त करीत आहेत.
Published on : 06-05-2022 13:29:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update