*ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील विकास कामांचा आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांचेकडून प्रत्यक्ष आढावा*
नवी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांमध्ये ‘क्विन्स नेकलेस’ म्हणून नावाजल्या जाणा-या पाम बीच मार्गालगतच्या सेक्टर 26 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या नैसर्गिक स्थळाचे नवी मुंबईकरांप्रमाणेच विविध कारणांसाठी नवी मुंबईला भेट देणा-या नागरिकांच्या मनातही विशेष स्थान आहे. येथील विस्तृत क्षेत्रफळात पसरलेल्या जलाशयाभोवतालची निसर्गरम्यता सहज आकर्षून घेते.
त्यामुळे *ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या पर्यटनदृष्ट्या विकासाकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात असून येथे 1 लाखाहून अधिक देशी प्रजातींच्या वृक्षांचे देशातील सर्वात मोठे मियावाकी स्वरूपाचे शहरी जंगल महानगरपालिकेचा कोणताही खर्च न होता ग्रीन यात्रा संस्थेच्या माध्यमातून सीएसआर निधीतून निर्माण करण्यात येत आहे. त्यासोबतच याठिकाणी मेडिटेशन सेंटर, नेचर वॉक, सायकल ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळांच्या आकर्षक सुविधा यांची उपलब्धता करून देत ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटनदृष्ट्या अधिकाधिक आकर्षक करण्यात येत आहे.*
*येथे सुरू असलेले मियावाकी पध्दतीचे वृक्षारोपण तसेच विविध सुविधा कामांचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मियावाकी पध्दतीची वृक्षलागवड पावसाळा व्यतिरिक्त कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण रितीने करणे गरजेचे असल्याने नियोजित 1 लक्ष 20 हजार वृक्षलागवडीतील उर्वरित 48 हजार वृक्षरोपांची लागवड कालबध्द कार्यक्रम राबवून मे महिन्याच्या अखेरपर्यंत गतीमानतेने पूर्ण करावी असे निर्देश उद्यान विभाग आणि ग्रीनयात्रा संस्थेच्या प्रतिनिधींना दिले. त्याचप्रमाणे पावसाळा कालावधीत करणे शक्य नसणारी स्थापत्य कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले.*
याप्रसंगी उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.जयदीप पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे तसेच संबंधित अभियंते, अधिकारी व ग्रीनयात्रा संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मे अखेरपर्यंत वृक्षारोपणाची कामे तातडीने करावयाची असल्याने त्या कामात स्थापत्य कामामुळे अडथळा येऊ नये याची काळजी घ्यावी असे अभियांत्रिकी विभागास निर्देश देतानाच आयुक्तांनी या वृक्षरोपांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात 24 तास करण्यात यावी असे निर्देश दिले. वृक्षरोपांकरिता वापरले जाणारे 100 टक्के पाणी हे महानगरपालिकेच्या ‘सी टेक’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रातील पुनर्प्रक्रियाकृतच असावे हे आयुक्तांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितले.
येथील मियावाकी शहरी जंगलामुळे या परिसराचे नैसर्गिक मूल्य अधिक वाढणार असून मियावाकी पध्दतीने वृक्षलागवडीच्या वेळी 1.5 फूट उंचीची वृक्षरोपे वर्षभराच्या कालावधीतच 10 ते 15 फूटांपर्यंत मोठी होत असल्याने हा परिसर हिरवाईने नटणार आहे. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक शांततेचा अनुभव नागरिकांना घेता यावा व ध्यान करता यावे याकरिता ज्वेलच्या विस्तृत परिसरात मोक्याच्या 2 ठिकाणी मेडिटेशन सेंटरही उभारण्यात येत आहे. तसेच या जंगलातून नागरिकांना नेचर वॉकचा अनुभव घेता यावा यासाठी ट्रॅकही बनविण्यात येत आहे. याशिवाय स्वतंत्र सायकल ट्रॅकही असणार आहे.
या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळेस या स्थळाचे मूळचेच आकर्षक रूप विविधरंगी रोषणाईच्या प्रकाश शलाकांनी अधिकच खुलून येते. याठिकाणी लहान मुलांसाठी बसविण्यात येणारी खेळणी जलद बसवून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले तसेच प्रसाधनगृह व्यवस्थाही पुरेशा प्रमाणात असावी असे आदेशित केले.
मियावाकी स्वरूपाच्या या शहरी जंगलातील वृक्षरोपांच्या संरक्षणासाठी चोहोबाजूंनी ग्रीन नेट लावण्यात यावी तसेच या विस्तृत परिसरात विशेषत्वाने महिलांसह सर्वच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेशावर नियंत्रण असावे आणि समाजकंटकांचा उपद्रव होऊ नये याकरिता पाम बीच मार्गाकडूनही प्रवेश नियंत्रित करून सुरक्षारक्षक नियुक्ती करणे तसेच सीसीटिव्ही यंत्रणा बसविणेचे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. पहिल्या टप्प्यात सध्याच्या प्रवेशाच्या पुढील बाजूने सुरक्षा कुंपणाचे निर्देशही देण्यात आले. त्याचप्रमाणे येथील जलाशयाची स्वच्छता करून परिसराचे सुशोभिकरण करणेविषयी ग्रीनयात्रा संस्थेने सविस्तर सर्व्हेक्षण करून उपाय सूचवावा असे सूचित केले.
*सध्या अतिशय तीव्र उन्हाळा जाणवत असून वृक्षारोपण हा जागतिक तापमानवाढीवरील एक प्रभावी उपाय आहे हे लक्षात घेत नवी मुंबईकर नागरिकांच्या लोकसंख्येएवढी वृक्षसंपदा म्हणजेच सध्या 4 माणसांमागे 3 झाडे इतके असलेले वृक्षप्रमाण एका व्यक्तीमागे एक झाड असे व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द काम करीत आहे. कोपरखैरणेतील निसर्गोद्यानानंतर नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर व इतर 5 ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबविली जाणारी मियावाकी शहरी जंगल निर्मिती संकल्पना हा याच उपाययोजनेचा एक भाग असून नवी मुंबईकर नागरिकांनीही आपल्या निसर्गाविषयीच्या कर्तव्याची जाणीव ठेवून वृक्षारोपण व संवर्धनावर भर द्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 07-05-2022 12:27:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update