*दिघा व ऐरोली विभागातील मान्सुनपूर्व कामांची आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाई, बंदिस्त गटारे सफाई, मलनि:स्सारण वाहिन्या सफाई यांची कामे अंतिम टप्यात असून ती 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त् श्री अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ही कामे योग्य प्रकारे होत असल्याबाबतची खातरजमा संबधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांनी प्रत्येक ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्षपणे करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले आहे. या सर्व कामांकडे आयुक्तांचेही बारकाईने लक्ष असून आज दिघा व ऐरोली विभागातील नाले, गटारे व मलनि:स्सारण वाहिन्यांच्या सफाई कामाची व पावसाळापूर्व कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
दिघा येथील ग्रीन वर्ल्ड सोसायटी समोरील नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करताना नाल्याच्या आतील बाजूस कडेला वाढलेली झाडेझुडपेही नालेसफाई करताना काढून टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. मुकंद कंपनीजवळील जंक्शनच्या ठिकाणी यावर्षी कल्व्हर्ट बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याने त्याठिकाणी यंदा पाणी भरणार नाही अशी माहिती अभियांत्रिकी विभागामार्फत देण्यात आली असता आयुक्तांनी तरीही याठिकाणी व मागील वर्षी सखल भागामुळे पाणी साचले अशा महापालिका क्षेत्रातील सर्वच ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपांची व्यवस्था करून ठेवावी असे निर्देश दिले.
बंदिस्त गटारांच्या सफाईची पाहणी करताना सफाई केल्यानंतर काढण्यात येणारा गाळ ओला असल्याने एक ते दोन दिवस तिथेच काठाशी सुकण्यासाठी ठेवला जातो. तो गाळ दोन दिवसानंतर न चुकता उचलण्याची कार्यप्रणाली आखून दयावी व त्यानुसार कार्यवाही होत आहे याकडे बारकाईने लक्ष दयावे अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात काही ठिकाणी उदयोगसमुहांमार्फत रासायनिक द्रव्ये सोडली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काही ठिकाणच्या नाल्यातील पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी व त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळवून दोषी आढळणा-यांवर कारवाई करण्याचे सूचित करावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
दिघा विभागात रामनगर, गणपतीपाडा, ईश्वरनगर, सुभाषनगर, कन्हैय्यानगर, इलठणपाडा भागांमध्ये पावसाळापूर्व कामांची पाहणी करताना आयुक्तांनी बोरला तलाव, रेल्वेचे इलठणपाडा धरण येथेही भेट देऊन पहाणी केली. त्याचप्रमाणे दिघा विभाग कार्यालयाजवळ बांधण्यात येत असलेल्या भूस्तरीय व उच्च्स्तरीय जलकुंभाच्या बांधकामांठिकाणी भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
ऐरोली विभागात एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या नियोजित काटई रस्त्याच्या कामामुळे सेक्टर 3 येथील नाल्याच्या पाण्याला अडथळा होण्याचा दाट संभव आहे. त्यामुळे याबाबत जराही निष्काळजीपणा न करता या नाल्यातील प्रवाहाला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही व पावसाळा कालावधीत या भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घेऊन तातडीने नालेसफाई करावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी एमएमआरडीएचे अभियंता उपस्थित होते. एमएमआरडीएने 25 मे पर्यंत नाले सफाई पूर्ण न केल्यास नवी मुंबई महानगरपालिकेने तातडीने सफाई करून घ्यावी असेही निर्देश यावेळी आयुक्तांनी महापालिका अधिका-यांना दिले.
टी जंक्शन येथील नालेसफाईच्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी तेथे सफाई काम करणा-या कामगारांशी संवाद साधून ते कुठून आले?, त्यांना काम करताना सुरक्षा साधने मिळतात का?, पगार किती मिळतो? अशा विविध गोष्टींची आपुलकीने विचारपूस केली. टी जंक्शन हा भाग सखल असल्याने पावसाळा कालावधीत पाणी साचून राहण्याचे संभाव्य ठिकाण आहे. त्यामुळे येथील बंदिस्त गटारांची सफाई तेथील वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर असलेली वर्दळ लक्षात घेऊन काटेकोरपणे व काळजीपूर्वक करण्याच्या तसेच त्या ठिकाणी पावसाळयात अतिरिक्त पाणी उपसा पंप ठेवण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.
या दौ-यात आयुक्तांनी यादवनगर शाळा इमारत बांधकाम, नवीन नाटयगृह बांधकाम तसेच गणेशनगर चिंचपाडा येथील सेंद्रींय घनकचरा व सांडपाणी वापराव्दारे बायोगॅस व वीज निर्मिती प्रकल्प स्थळाचीही पहाणी केली.
यावर्षी मान्सुनचे नेहमीपेक्षा लवकर आगमन होणार आहे असे हवामान खात्याने जाहीर केले असून ते लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांना गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी या दौ-यामध्ये उपस्थित शहर अभियंता श्री संजय देसाई व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ बाबासाहेब राजळे आणि इतर अधिका-यांना दिले.
Published on : 13-05-2022 14:01:19,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update