*कोपरखैरणे व घणसोली विभागातील पावसाळापूर्व नाले व गटारे सफाई कामाची आयुक्तांकडून पाहणी*






या वर्षी मान्सुनचे आगमन दरवर्षीपेक्षा लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या सफाई कामांना वेग देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 09 मे 2022 रोजीच्या आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी करण्यात येत असून दिघा व ऐरोली विभागानंतर आयुक्तांनी आज कोपरखैरणे व घणसोली विभागातील पावसाळापूर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
कोपरखैरणे सेक्टर 10 येथील आकाराने मोठ्या नाल्याच्या सफाईची पाहणी करताना आयुक्तांनी नाला आकाराने लहान असो वा मोठा, त्याच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊन पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेऊन नाले सफाईची कामे करावीत असे निर्देश दिले. सेक्टर 9 येथील होल्डींग पॉंडच्या काठाशी खाडीचे पाणी भरती – ओहोटीनुसार आत – बाहेर येण्यासाठी करण्यात आलेल्या फ्लॅपगेट्सच्या कामाची पाहणी करीत शहरातील सर्व फ्लॅपगेट्स योग्य रितीने कार्यान्वित राहतील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
नाले, गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या यांच्या सफाईची कामे आत्ताच काटेकोरपणे करावीत असे स्पष्ट निर्देश देत सफाई व्यवस्थित न झाल्यामुळे पावसाळी कालावधीत पाणी साचण्याची घटना घडल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले.
कोपरखैरणे रेल्वे स्टेशन जवळील रुळांखालून ठाणे बेलापूरकडे जाणा-या भूयारी मार्गाची आयुक्तांनी पाहणी केली. त्याठिकाणी सखल भाग असल्यामुळे पावसाळी कालावधीत भरतीच्या वेळीच अतिवृष्टी असल्यास या भूयारी मार्गात पाणी साचते. ते उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था करण्यात आलेली असून सदर पंप व्यवस्थित सुरु राहतील व त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्याठिकाणी पर्यायी पंपांची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच भूयारी मार्ग सखल भागात असल्याने त्याठिकाणीही पर्यायी पंपांची व्यवस्था कऱण्यात यावी असे यावेळी आयुक्तांनी निर्देशित केले.
कोपरखैरणे व घणसोली विभागातील विविध ठिकाणच्या नाल्यांची तसेच भूयारी गटारांची व मलनि:स्सारण वाहिन्यांची पाहणी करताना कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या साफसफाई कामांची पडताळणी करण्याची कार्यप्रणाली करावी व त्याची पाहणी करताना आपल्या पर्यवेक्षण यंत्रणेने काटेकोरपणे तपासणी करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
रबाळे एमआयडीसी भागात निब्बान टेकडी उतरल्यानंतर सखल भागात मागील वर्षी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे लोकांना झालेला त्रास दूर करण्यासाठी व यावेळी पाणी साचू नये म्हणून महापालिका अभियांत्रिकी विभागामार्फत तेथील कच्च्या गटारांची अधिक काटेकोर सफाई करण्यात आलेली असून मुख्य रस्त्याच्या कडेने भूयारी गटारांचे कामही करण्यात आलेले आहे. या कामाची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील साफसफाईकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्वच विभागातील मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून 80 टक्क्याहून अधिक साफसफाई कामे पूर्ण झालेली आहेत. पावसाळी कालावधीत नागरिकांची अडचण होऊ नये याकरिता आधीच सतर्कता राखत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर मान्सूनपूर्व कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करीत आहेत. त्यामुळे कामांना गतीमानता देतानाच त्याच्या गुणवत्तेकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे.
Published on : 18-05-2022 14:50:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update