*पावसाळी कालावधीतील हिवताप, डेग्यू सारखे आजार व साथरोग प्रतिरोधासाठी महापालिका सज्ज*
1.jpg)




पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद् भवण्याची शक्यता असते. याविषयी नमुंमपा आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारीविषयी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असते. यामधील सूचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे.
जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पाळण्यात येत असून या महिन्यामध्ये विशेषत्वाने घणसोली, नोसीलनाका, महापे, कोपरखैरणे, कूकशेत, नेरुळ II, तुर्भे इंदिरानगर, पावणे अशा अतिसंवेदनशील कार्यक्षेत्रात घरांतर्गत विशेष डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम तसेच ताप रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असते.
या विशेष मोहिमेअंतर्गत जून 2022 मध्ये आत्तापर्यंत 68,772 एवढया घरांना भेटी देण्यात आलेल्या असून त्यापैकी 1,22,884 घरांच्या आतील स्थानांची तपासणी करण्यात आलेली आहे. या पाहणीमध्ये 496 एवढी स्थाने दूषित आढळून आलेली आहेत.
त्याचप्रमाणे सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नियमितपणे सुरू असलेली घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम विद्यमान जून महिन्यामध्ये अधिक प्रभावीपणे राबविण्यात घेण्यात येत असून सद्यस्थितीत 81,266 घरांना भेटी देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 1,48,609 एवढया घरांतर्गत स्थानांची तपासणी करण्यात आलेली असून 1092 एवढी स्थाने दूषित आढळलेली आहेत. त्यापैकी 733 एवढी स्थाने नष्ट करण्यात आलेली असून उर्वरित 382 एवढी स्थाने उपचारीत करण्यात आलेली आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील बांधकाम सुरू असलेल्या 23 ठिकाणी हिवताप जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 7163 इतक्या सहभागी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी हस्तपत्रके, पोस्टर्स व बुकलेटचे वाटप करुन हिवताप / संशयित डेंगी इ. किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे.
या कालावधीत किटकजन्य आजारामध्ये हिवताप, डेंग्यु, चिकनगुनिया असे आजार तसेच गॅस्टो व अतिसार असेही आजार होतात. यापैकी हिवतापाचा प्रसार ॲनाफिलिस डासाच्या मादीपासून होतो. या डासांची उत्पत्ती पाण्याच्या टाक्या, कुलरचे पाणी, रांजण, माठ, स्वच्छ पाण्याची डबकी अशा साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. डास हिवताप रुग्णास चावतो, त्यावेळी रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. असा दूषित डास निरोगी माणसास चावल्यास 10 ते 12 दिवसांनी थंडी वाजून ताप येवून डासाव्दारे हिवतापाचा प्रसार होतो. त्यादृष्टीने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
हिवतापाची लक्षणांमध्ये - थंडी वाजून ताप येणे, ताप थोडा वेळ टिकणे, ताप कमी होताना भरपूर घाम येऊन उतरणे अशी लक्षणे दिसतात. हा ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो. तसेच तापाबरोबर डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, पाठदुखी व थकवा जाणवतो.
डेंग्युच्या लक्षणांमध्ये - एकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी स्नायुदुखी, सांधेदुखी व उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी असणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे – अशी लक्षणे दिसून येतात.
याकरिता नागरिकांनी – गच्चीवर अथवा घराच्या परिसरात असलेले भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, उघडयावरील टायर्स इत्यादी नष्ट करावे, घरातील फुलदाण्या, ट्रे, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे, घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम / टाक्या / भांडी आठवडयातून एकदा काढून पूर्णपणे कोरडी करावीत, शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदानीचा वापर करावा, आपले घर, कार्यालय, व परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा, सर्व पाण्याचे साठे झाकून बांधून ठेवावेत, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांमार्फत व महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये / नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी करुन घ्यावी.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळी कालावधीत होणा-या मलेरिया, डेंग्यु सारख्या आजारांवरील नियंत्रणाकरिता रक्त तपासणीवर महानगरिपालिकेमार्फत विशेष भर देण्यात येत आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2020 या वर्षात 45,872 ब्लड स्मेअर तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये मलेरियाचे 26 रूग्ण आढळून आले. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षात 94,420 ब्लड स्मेअर तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये मलेरियाचे 22 रूग्ण आढळून आले. यावर्षी जानेवारी ते जून 2022 या साधारणत: 6 महिन्यांच्या कालावधीत 37,147 ब्लड स्मेअर तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये मलेरियाचे 6 रूग्ण आढळून आले आहेत.
अशाच प्रकारे जानेवारी ते डिसेंबर 2020 या वर्षात डेंग्युचे 27 संशयित रूग्ण आढळलेले होते मात्र तपासणीअंती पॉझिटिव्ह डेंग्यु रूग्णसंख्या शून्य होती. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षात डेग्युचे 652 संशयित रूग्ण आढळलेले होते मात्र त्यापैकी 8 पॉझिटिव्ह डेंग्यू रूग्ण होते. यावर्षी जानेवारी ते जून 2022 या साधारणत: 6 महिन्यांच्या कालावधीत 85 संशयित डेंग्यू रूग्ण आढळलेले असून त्यापैकी एकही पॉझिटिव्ह डेंग्यू रूग्ण नाही.
लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा संसर्ग मुख्यत्वे रोगबाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गायी, म्हशी, कुत्री यांच्या लघवीमुळे दूषित झालेल्या पाण्यातून होतो. त्याची लक्षणे तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखी, थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्त्राव, डोळे सुजणे अशी असून गंभीर रुग्णांमध्ये मूत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यूही संभवतो. लेप्टोस्पायरोसिस आजार टाळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दूषित पाणी, माती किंवा भाज्यांशी संपर्क टाळणेच दूषित पाण्याशी संपर्क ठेवणे अपरिहार्य असल्यास रबरी बूट, हातमोजे वापरणे गरजेचे आहे. या रोगाकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तथापि 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक रुग्णालय, वाशी, नेरुळ, ऐरोली येथे या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध आहेत.
अशाच प्रकारे पावसाळी कालावधीत उद्भवणा-या गॅस्टो, अतिसार, हगवण या आजारांबाबतही नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच ताप येणे, अतिसार, उलट्या होणे तसेच हात पाय गार पडणे, त्वचा शुष्क पडणे अशी जल शुष्कतेची लक्षणे आढळल्यास त्वरित नजिकच्या महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वा रुग्णालयात जाऊन डॅाक्टरांच्या सल्याप्रमाणे उपचार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
पावसाळी कालावधीत होणा-या आजारांचा धोका लक्षात घेऊ नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 28-06-2022 16:42:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update