*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायन, नृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धेला उदंड प्रतिसाद*
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त् श्री अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
यामध्ये महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कलावंत व खेळाडू यांच्या अंगभूत कला - क्रीडा गुणांना उत्तेजन देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अमृत गायन स्पर्धा, अमृत एकपात्री अभिनय स्पर्धा, अमृत नृत्य स्पर्धा अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधील सादरीकरणासाठीचे विषय देशप्रेम व देशाभिमान अविष्कृत करणारे आहेत.
यामधील अमृत गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी 3 ऑगस्ट 2022 रोजी विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न झाली. यामध्ये 15 वर्षाखालील लहान गटात 62 तसेच 15 वर्षावरील मोठया गटात 102 अशा एकूण 164 गायक कलावंतानी उत्स्फुर्त सहभाग घेतला. प्राथमिक फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द गायिका श्रीम. रसिका जोशी व श्री. ऋग्वेद देशपांडे यांनी केले. प्राथमिक फेरीतील 164 गायकांमधून 32 गायक स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली असून त्यांची 8 ऑगस्ट 2022 रोजी विष्णुदास भावे नाटयगृहात स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखदार स्वरुपात संपन्न होणार आहे.
अशाचप्रकारे अमृत एकपात्री अभिनय स्पर्धेची प्राथमिक फेरीही विष्णुदास भावे नाटयगृहात 3 ऑगस्ट रोजीच झाली त्यामध्ये नमुंमपा क्षेत्रातील 82 अभिनेत्यांनी सहभाग घेतला. यामध्ये 15 वर्षाखालील लहान गटातील सहभागी 51 तसेच 15 वर्षावरील मोठया गटातील 31 स्पर्धकांमधून परीक्षक श्री समीर खांडेकर यांनी अंतिम फेरीसाठी 20 अभिनेत्यांची निवड केलेली आहे. अमृत एकपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी देखील 8 ऑगस्ट 2022 रोजी विष्णुदास भावे नाटयगृहात संपन्न होणार आहे.
त्याचप्रमाणे 4 ऑगस्ट 2022 रोजी अमृत नृत्य स्पर्धा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 134 नृत्य कलावंताच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली. यामध्ये 15 वर्षाखालील लहान गटात 51 आणि 15 वर्षावरील मोठया गटात 31 नृत्य कलावंतानी सहभाग घेतला. स्पर्धेचे परिक्षक नृत्य दिग्दर्शक श्री. सचिन पाटील यांनी प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी 34 कलावंताची निवड केली. अमृत नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी 10 ऑगस्ट 2022 रोजी विष्णुदास भावे नाटयगृहात उत्साहात संपन्न होणार आहे.
अमृत गायन स्पर्धेकरिता देशभक्तीपर गीते तसेच अमृत नृत्य स्पर्धेकरिता देशभक्तीपर नृत्य त्याचप्रमाणे एकपात्री अभिनय स्पर्धेकरिता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असे विषय देण्यात आले होते.
या तिन्ही स्पर्धांना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गायन, नृत्य व अभिनय क्षेत्रातील कलावंतानी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत या स्पर्धा सर्वार्थाने यशस्वी केल्या आहेत. तरी नवी मुंबईकर कलावंतांच्या गुणवत्तेचा अविष्कार अनुभवण्यासाठी कला रसिकांनी 8 ऑगस्ट रोजी अमृत गायन व अमृत एकपात्री अभिनय स्पर्धा तसेच 10 ऑगस्ट रोजी अमृत नृत्य स्पर्धा अंतिम फेरीप्रसंगी उपस्थित राहून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या कलावंताना प्रोत्साहित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-08-2022 12:20:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update