जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभात अनुभवसमृध्द पिढीचा गौरव
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभव संपन्न महत्वाचे घटक आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणारी नवी मुंबई ही देशातील अग्रगण्य महानगरपालिका असून नवी मुंबईच्या प्रगतिशील वाटचालीत ज्येष्ठ नागरिकांचा नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत त्यांच्या अंगभूत कलाक्रीडागुणांना उत्तेजन देणारे विविध उपक्रम आयोजित करून दरवर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विशेष समारंभाचे आयोजन करण्यात येत असते.
मागील दोन वर्षे कोव्हीड 19 प्रभावीत कालावधीमुळे आयोजित करता न येऊ शकलेला ज्येष्ठ नागरिक दिनाचा समारंभ विष्णुदास भावे नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर ऐरोली विधानसभा सदस्य आ. श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आ. श्री. रमेश पाटील, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, फेसकॉम या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव श्री. सुरेश पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक असून नवी मुंबई महानगरपालिका सुरुवातीपासूनच ज्येष्ठांविषयी आपुलकीने काम करीत आहे. ज्येष्ठांची विरंगुळा केंद्रे ही त्यांच्यासाठी एकत्र जमून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा मानसिक आधार असून सध्याच्या 27 विरंगुळा केंद्रांच्या संख्येत वाढ करावी अशी सूचना ऐरोली विधानसभा सदस्य आ. श्री. गणेश नाईक यांनी केली. त्याचप्रमाणे अडचणीत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहकार्याचा हात देण्यासाठी संपर्क क्रमांक असणारे मदत केंद्र सुरु करावे असेही त्यांनी सूचित केले.
बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करीत आपल्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक भवन अर्थात ओल्ड एज होमचे काम मार्गी लागले असून लवकरच ते आपल्या सेवेसाठी कार्यान्वित होईल असे सांगितले. यामुळे आधार गमाविलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानपरिषद सदस्य आ. श्री. रमेश पाटील यांनी निवासयोग्य शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक होत असताना हे ज्येष्ठांनाही आपुलकी देणारे शहर आहे असा विशेष उल्लेख करीत ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत राबविल्या जात असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी सूचना केली.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी बोलताना आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम असल्याने माझ्या आयुक्त म्हणून कामकाजाची सुरुवात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने होते ही भाग्याची गोष्ट असल्याचे सांगत आरोग्य सुविधा व इतर बाबींमुळे आयुर्मान वाढत चालल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे सांगितले. जागतिक पातळीवर झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे आता दोन पिढ्यांच्या नोकरी – व्यवसायात फरक दिसत असून पुर्वीची पिढ्यानुपिढ्या एकच व्यवसाय करण्याची पध्दती बदलल्याने मागच्या पिढीच्या अनुभवांची नव्या पिढीला आवश्यकता भासत नाही. त्यामुळे दोन पिढ्यांमधील मानसिक अंतर वाढत जाणे ही जागतिक पातळीवरील प्रश्न असल्याचे मत मांडले. त्याचप्रमाणे आजच्या काळातील विकेंद्रीत कुटुंब पद्धतीमुळे संवाद कमी झालेल्या जगात ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन आपल्या समवयस्क लोकांशी संवाद साधण्यासाठी विरंगुळा केंद्रे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
समाजविकास विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी ज्येष्ठ नागरिकांप्रती नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच आदराची भावना विविध कार्यातून व योजनांमधून व्यक्त केली असून ज्येष्ठांच्या अंगभूत गुणांना उत्तेजन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्याची परंपरा कायम राखली असल्याचे सांगितले. कोव्हीड कालावधीनंतर 2 वर्षांनी हा कार्यक्रम संपन्न होत असल्याने ज्येष्ठांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वयाची 75 वर्षे पूर्ण करणा-या 232 ज्येष्ठ नागरिकांचा तसेच लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा 26 दाम्पत्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कॅरम (108 स्पर्धक), बुध्दीबळ (32 स्पर्धक), गायन (37 स्पर्धक), काव्यवाचन (19 स्पर्धक), वेशभुषा (8 स्पर्धक), कथाकथन (13 स्पर्धक), नाटिका (4 स्पर्धक), ब्रीझ (21 स्पर्धक) व निबंध (24 स्पर्धक) अशा विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला.
यामध्ये कॅरम स्पर्धेत पुरुष गटात सतीश करवाडकर व महिला गटात अमिता पै विजेते ठरले. बुध्दीबळ स्पर्धेत रमेश मोहिते, गायन स्पर्धेत गणपत सावंत, काव्यवाचन स्पर्धेत रेखा वाळवेकर, वेशभूषा स्पर्धेत अंकुश जांभळे, कथाकथन स्पर्धेत अरविंद वाळवेकर, नाटिका स्पर्धेत राम काजरोळकर, निबंध स्पर्धेत प्रज्ञा सारंग आणि ब्रीज स्पर्धेत दिलीप वैद्य व जयंत कुमार हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. याप्रसंगी स्पर्धा परीक्षक श्री. रविंद्र पारकर (कॅऱम), श्रीम. शुभांगी साळुंखे (बुध्दीबळ), श्री. संजय गडकरी (ब्रीज), श्रीम. मधुरा परांजपे (गायन व कथाकथन), श्रीम. नयन पवार (काव्यवाचन), श्री. सचिन पवार (नाटिका), श्रीम. पल्लवी बुलाखे (वेशभूषा), श्रीम. ए.एस.कासारे (निबंध) यांचाही सन्मान करण्यात आला.
1 ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी नवी दिल्ली येथे आयोजित स्वच्छ अमृत महोत्सव समारंभात देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त झाला. त्या पार्श्वभूमीवर 3 ऑक्टोबर रोजी आयोजित आजच्या विशेष समारंभात स्वच्छतेच्या राष्ट्रीय मानांकनाचा आनंदोत्सव करण्यात आला तसेच आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला सामोरे जाताना त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभव समृध्द सहकार्याने आपल्या शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आला.
Published on : 03-10-2022 15:33:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update