नवरात्रौत्सवातील माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाला नवी मुंबईतील महिलांचा उत्तम प्रतिसाद
नवरात्रौत्सवात अदिशक्तीचा गजर होत असताना महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या करण्यात आल्या.
18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानात महानगरपालिकेची 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व 3 रुग्णालये आणि 2 माता बाल रुग्णालये याठिकाणी तज्ज्ञांमार्फत 18 वर्षे वयोगटावरील 12381 महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांची उंची, वजन व रक्तदाबाची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे 3933 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे 30 वर्षे वयोगटामधील 6655 महिलांची तपासणी करण्यात आली.
या अभियानांतर्गत सीबीडी पोलीस स्टेशनमध्येही विशेष शिबिर घेत 14 महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.
या अभियानाचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा यासाठी महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य सेविका यांच्यामार्फत नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन माहिती देण्यात आली. तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे आणि हस्तपत्रके, बॅनर्सव्दारेही अभियानाची जनजागृती करण्यात आली.
26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या अभियान कालावधीत प्राथमिक नागरी आऱोग्य केंद्रात महिला व मातांची वजन व उंची घेऊन बीएमआय काढणे, एचबी परसेंटेज काढणे, रक्तदाब, मधुमेह व लघवी तपासणी करण्यात आली. कोव्हीड लसीकरण करण्यात आले. गरोदर माता व प्रसुती पश्चात माता यांचीही विशेष तपासणी कऱण्यात आली. आयर्न - फोलीक ॲसिड व कॅल्शियम पुरक मात्रा असलेल्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पोषण, स्तनपान, तंबाखु व मद्यपान सेवनामुळे गर्भधारणेस होणारे धोके, प्रसुती करिता योग्य आरोग्य संस्थेचा निर्णय घेणे अशा विविध विषयांवर समुपदेशन करण्यात आले. अतिजोखमीच्या मातांना संलग्न रुग्णालयात संदर्भित करण्याची कार्यवाही करण्यात आली.
अशाचप्रकारे रुग्णालयातील शिबीरात दुपारी नियमितपणे एएनसी कॅम्प अंतर्गत गरोदर माता, प्रसुती झालेल्या माता, जननक्षम महिला व 45 वर्षावरील महिला यांची तज्ज्ञांमार्फत तपासणी तसेच प्रत्येक मातेची उंची, वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिन यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे स्त्रीरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ यांच्यामार्फतही तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार इतर आरोग्य चाचण्याही करण्यात आल्या. प्रत्येक आजारी महिलेला तिच्या आजारानुसार औषधोपचार व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार असून समुपदेशनही करण्यात येत आहे.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे विशेष अभियान 5 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येत असून 18 वर्षावरील महिलांनी आपल्या नजिकच्या महानगरपालिका रुग्णालय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत स्वत:ची आरोग्य तपासणी करून घ्यावी व आवश्यकतेनुसार औषधोपचार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 04-10-2022 13:47:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update