: *आंतरराष्ट्रीय बाल दिनाच्या निमित्ताने आयकॉनिक नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूला निळी झळाळी*
२० नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त युनिसेफ या जागतिक पातळीवर कार्यरत नामांकित संस्थेच्या वतीने संपूर्ण जगभरात विविध देशांमध्ये निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय वास्तू ही भारतातील वास्तूरचनेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखली जाते. त्यामुळे युनिसेफच्या भारतातील प्रमुखांच्या वतीने आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय वास्तूला प्रतिकात्मक रितीने निळ्या रंगाची प्रकाशयोजना करावी अशी विनंती करण्यात आली होती.
त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय बाल दिनाच्या आदल्या व नंतरच्या दिवशी म्हणजेच दिनांक 19, 20 व 21 नोव्हेंबर असे तीन दिवस नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय इमारत निळया रंगात उजळून निघते आहे.
आंतरराष्ट्रीय बाल दिनाचे यावर्षीचे उद्दिष्ट 'मुलांचा खेळण्याचा हक्क' हे असून या माध्यमातून मुलांच्या जडणघडणीतील खेळाचे महत्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होते शिवाय विविध कौशल्यांचा विकास होतो, निर्णयक्षमता वाढते, सांघिक भावना निर्माण होते व या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्व सक्षमीकरण होते हे लक्षात घेऊन यावर्षी खेळाच्या माध्यमातून मुलांचा विकास हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच शहरातील मुलांच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक सुविधा आणि पोषक वातावरण निर्मिती केलेली आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा महोत्सवामध्ये 48 हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये 300 हून अधिक शाळांमधील 30 हजारहून अधिक मुले स्वतःच्या अंगभूत क्रीडा गुणांचे प्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे युनिसेफच्या विनंतीनुसार नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त करण्यात आलेली निळ्या रंगातली झळाळी नवी मुंबईकर मुलांच्या क्रीडा विकासाचे प्रतिक ठरत आहे.
Published on : 21-11-2022 06:32:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update