तुर्भे येथे धडाकेबाज कारवाईत 1 टन200 किलोहून अधिक प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त व 25 हजार दंडात्मक वसूली

'स्वच्छ सर्वेक्षण 2023' च्या अनुषंगाने मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात सर्वच विभागांमध्ये प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहिमा अधिक प्रभावी रितीने राबविण्यास सुरुवात झालेली आहे.
अशाच प्रकारची एक धडाकेबाज मोहीम आज परिमंडळ १ उपायुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या नियंत्रणाखाली, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री सुखदेव येडवे आणि तुर्भ विभागातील अधिकारी - कर्मचारी समुहाने राबविली.
तुर्भे विभाग कार्यक्षेत्रातील प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणाऱ्या तीन विक्रेत्यांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच पहिल्यांदा गुन्हा असल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 5 हजार याप्रमाणे एकूण रु 15 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
त्याचप्रमाणे सेक्टर 18, तुर्भे, महावीर मार्केट येथील साईपूजा प्लास्टिक येथील गोडाऊनवर धाड घालत तब्बल 1200 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा माल जप्त करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. या व्यावसायिकाकडून यापूर्वीही प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराचा गुन्हा घडला असल्याने व हा दुसऱ्यांदा गुन्हा झाला असल्याने त्याच्याकडून रु. 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तसेच साधारणतः 1200 किलो प्लास्टिकचा साठाही जप्त करण्यात आला व त्यास समज देण्यात आली.
महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात सर्वच विभागांमध्ये प्रतिबंधात्मक प्लास्टीक मोहिमा तीव्र करण्यात आल्या असून नागरिकांनीही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णतः टाळून पर्यावरणाला प्लास्टिकमुळे होणारा धोका लक्षात घेऊन कापडी अथवा कागदी पिशव्यांचा वापर करावा तसेच प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापर पूर्णतः थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 11-12-2022 13:17:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update