नागरी सुविधा कामांना गती देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आढावा बैठकीत निर्देश

महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत सुरु असलेल्या नागरी सुविधा कामांना वेग देऊन त्यांची विहित वेळेत पूर्तता करण्याकडे व नागरिकांना समाधानकारक सेवा उपलब्ध करून देण्याकडे सर्व विभागप्रमुखांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विभागांच्या आढावा बैठकीमध्ये दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
‘इज ऑफ लिव्हिंग इंन्डेक्स’ या केंद्र शासनामार्फत जाहीर निवासयोग्य शहरांच्या स्पर्धेमध्ये नागरिकांच्या अभिप्रायाला महत्व असून जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांनी http:/bit.ly/3ObpOa0 या लिंकवर आपले शहराविषयीचे अभिप्राय नोंदवावेत यादृष्टीने मुख्यालयाप्रमाणेच विभाग पातळीवरूनही नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्न व्हावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले.
त्याचप्रमाणे पीएम स्वनिधी अंतर्गत फेरीवाल्यांना बँकांमार्फत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे महानगरपालिकेला दिलेले उद्दिष्ट पूर्ण कऱण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरून अजून गतीमानतेने काम करण्याची आवश्यकता आयुक्तांनी लक्षात आणून दिली. ज्या फेरीवाल्यांची कागदपत्रे पूर्तता झालेली आहेत त्या फेरीवाल्यांना बँकांमार्फत कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बँक व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
ज्या मार्केटच्या इमारती बांधून तयार आहेत अशा मार्केटमध्ये महानगरपालिकेकडे नोंदणी आहे अशा तेथील विक्रेत्यांना जागा वाटप करून ही मार्केट्स लवकरात लवकर नागरिकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करावीत अशा सूचना देतानाच आयुक्तांनी मालमत्ता विभाग व विभाग अधिकारी यांनी संयुक्तपणे याविषयीची सुयोग्य अंमलबजावणी करावी असे निर्देशित केले व मार्केट्सचा विभागवार आढावा घेतला.
दिव्यांगांना लॉटरी काढून स्टॉल्सचे विभागवार वितरण जाहीर झाले असून त्यांच्या अर्जांची छाननीही झालेली आहे. त्यामधील योग्य दिव्यांगांना स्टॉल्सचे प्रत्यक्ष वितरण करण्याची कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. तसेच महानगरपालिकेच्या इतर मालमत्तांमधील गाळे भाड्याने देण्याची कार्यवाहीदेखील सर्व नियम तपासून सुरु करावी असे निर्देशित करण्यात आले.
घणसोली सेक्टर 9 येथे नव्याने बांधण्यात आलेली नागरी आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झालेली असून त्याठिकाणी नवीन नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची कार्यवाही तत्परतेने करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागातही 2 नागरी आरोग्य केंद्रांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याठिकाणचे आवश्यक फर्निचर, औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आत्तापासूनच कार्यवाही सुरु करावी असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
‘झोपडपट्टी तेथे ग्रंथालय’ संकल्पनेअंतर्गत 10 ग्रंथालयांपैकी 6 ग्रंथालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून 4 ग्रंथालयांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्याठिकाणी ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी व पुस्तक निवडताना सर्व वयोगटातील वाचकांना आवडतील अशी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध करून घ्यावीत अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. या पुस्तकांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा पुस्तकांचा समावेश करावा असे सूचित करण्यात आले. पुस्तकांची निव़ड़ सर्वसमावेशक असावी यादृष्टीने एक समिती स्थापन करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
सेक्टर 3, वाशी येथील मंगल कार्यालयाची इमारत बांधून तयार असून नागरिकांच्या मागणीनुसार ती लवकरात लवकर वापरात आणण्याच्या दृष्टीने कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण कऱण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. आदिवासी घरे, वृध्दाश्रम, वर्कींग वुमेन हॉस्टेल बाबतही यावेळी विचार विनिमय करण्यात आला.
तुर्भे येथे नुकतीच 1200 किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली, त्याबद्दल अभिनंदन करीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक दिसूच नये याकरिता सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात अधिक प्रभावीपणे प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. या कारवायांमध्ये सातत्यपूर्णता राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण विषयक कामांना गतीमानता देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु असलेल्या कामांबाबत सतर्क राहून ती गुणवत्तापूर्ण व्हावीत व विहित कालावधीत व्हावीत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी निर्देशित केले.
Published on : 12-12-2022 13:30:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update