आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व सी ॲण्ड डी वेस्ट प्रकल्पाची पाहणी
शहर स्वच्छतेमधील डेब्रीज ही एक मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प (C & D Waste Project) कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या प्रकल्पस्थळाला भेट देत तेथील कार्यप्रणालीची सविस्तर पाहणी केली व हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना त्यांचा बांधकाम व पाडकाम कचरा महानगरपालिकेकडे पुढील प्रक्रियेसाठी हस्तांतरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्याकरिता 8898017009 हा मोबाईल क्रमांक जाहीर केलेला आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास निश्चित केलेली रक्कम भरून नागरिकांचा बांधकाम व पाडकाम कचरा महानगरपालिकेच्या वतीने संकलीत करण्यात येतो. याशिवाय शहरात खुल्या जागांवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकले जाऊ नये याकरिता 2 डेब्रीज भरारी पथके परिमंडळनिहाय लक्ष ठेवून असतात.
तथापि विशेषत्वाने रात्रीच्या वेळी आडबाजूला अनधिकृतपणे रस्त्याच्या कड़ेला डेब्रीज टाकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वच्छ शहराचे मानांकन सातत्याने उंचाविणारे शहर म्हणून नवी मुंबईकडे अपेक्षेने पाहिले जात असताना शहर स्वच्छतेला बाधा पोहचविणा-या अनधिकृतपणे टाकल्या जाणा-या डेब्रीजवर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. यादृष्टीने भरारी पथके सक्षम करणे व त्यांच्या सोबत शहर सौंदर्याला बाधा पोहचविणारे डेब्रीज उचलण्यासाठी वाहने उपलब्ध करून देणे याबाबीची मूल्यात्मक तपासणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
सी ॲण्ड डी वेस्ट प्रकल्पस्थळी सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करताना तेथील कामगारांनी सुरक्षा साधने नियमित वापरावीत अशा सूचना त्यांनी केल्या. याठिकाणी सी ॲण्ड डी वेस्टपासून तयार होत असलेले पेव्हर ब्लॉक, विटा यासारखे उत्पादन नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधकामांमध्ये वापरावे तसेच बांधकाम व्यवसायिकांनाही ते वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आयुक्तांनी सूचित केले.
यावेळी प्रकल्पस्थळावरील ओल्या कच-यापासून खत निर्मिती प्रक्रियेचीही आयुक्तांनी बारकाईने पाहणी करत माहिती घेतली. या प्रक्रियेत ओल्या कच-यावर 28 दिवसांमध्ये बायोकल्चर फवारण्यात येऊन विन्ड्रोज तयार केले जातात. त्यानंतर विविध चाळण्यांमधून प्रक्रिया केली जाते व सेंद्रीय खत तयार होते. हे सेंद्रिय खत गार्ड़न सिटी अशी ओळख असणा-या नवी मुंबईतील विविध उद्याने फुलविण्यासाठी वापरले जात असून शेतक-यांनाही याची विक्री केली जाते. या खताचे वितरण जास्तीत जास्त लोकांना केले जाईल याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे नागरिकांनी घरातच ओला व सुका असे वर्गीकरण करावे याविषयी नागरिकांना प्रबोधन केले जात आहे. असा महानगरपालिकेमार्फत संकलित केलेला वर्गीकृत कचरा वाहतुक करतेवेळी कोणत्याही प्रकारे एकत्रित होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
प्रकल्पस्थळी असलेल्या वजन काट्यावरील संगणक प्रणालीचीही आयुक्तांनी पाहणी केली. तसेच तेथील लिचेट प्रक्रिया प्रकल्प स्थळाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची व स्काडा प्रणालीची माहिती घेतली. प्रकल्पस्थळी येणा-या घनकच-यावर डिओड्रन्टचे स्प्रेईंग करण्यात येते. याठिकाणी कच-याच्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही अशाप्रकारे स्प्रेईंग करण्याची दक्षता घ्यावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित तुर्भे एमआयडीसी येथे असलेला नवी मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणशील प्रकल्प म्हणून देशापरदेशातील तज्ज्ञ व्यक्तींकडून नावाजला गेला असून यामध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुसार आवश्यक अत्याधुनिक तांत्रिक बदल करावे व येथील कार्यप्रणाली कायम अद्ययावत राहील याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रकल्प पाहणीअंती दिले.
Published on : 16-12-2022 13:15:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update