बीपीएमएस ऑनलाईन संगणकीय कार्यप्रणाली वरील कार्यशाळेला वास्तुविशारद व विकासकांचा उत्तम प्रतिसाद
महाराष्ट्र राज्यातील सर्व नियोजन प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणा-या बांधकाम परवानग्या या ऑनलाईन पध्दतीने दिल्या जाव्यात अशा प्रकारचे निर्देश नगरविकास विभागामार्फत देण्यात आलेले आहेत. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत (महा आयटी) बीपीएमएस ही ऑनलाईन संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा उपयोग करून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याच्या कार्यवाहीस सुरुवात करण्यात आलेली आहे.
ही कार्यप्रणाली वास्तुविशारद आणि विकासक यांच्याकडून नियमितपणे राबविली जावी यादृष्टीने विविध स्तरांवरून प्रयत्न करण्यात येत असून या प्रणालीव्दारे ऑनलाईन बांधकाम परवानगी प्राप्त करण्याच्या कार्यप्रणालीत वापरकर्त्यांना जाणविणा-या अडचणी दूर कऱण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार नगररचना विभागामार्फत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत संपन्न झालेल्या या कार्यशाळेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 120 हून अधिक वास्तुविशारद व विकासक सहभागी झाले होते. महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी प्रास्ताविकपर मनोगतात कार्यशाळेच्या आयोजनापाठीमागील भूमिका विषद करीत वास्तुविशारद व विकासक हे वापरकर्ते आणि प्रणालीचे निर्माते महाआयटी यांचा परस्परांशी सुसंवाद घडवून आणून या प्रणालीचा वापर जास्तीत जास्त व्हावा यादृष्टीने समन्वयाचे काम कार्यशाळेच्या माध्यमातून महानगरपालिका करित असल्याचे सांगितले.
महाआयटीच्या वतीने श्री. गिरीश गोसावी, श्री. मिहिर शहा व श्री. रघुराव यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून या प्रणालीमुळे कामकाजाला गतीमानता येईल असे सांगत प्रणालीच्या वापराविषयी मार्गदर्शन केले.
नवी मुंबई वास्तुविशारद असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कौशल जाडीया तसेच बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी श्री. बी.एम.सीराज यांनीही महानगरपालिकेने पुढाकार घेऊन वास्तुविशारद व विकासकांसाठी कार्यशाळा आयोजित केली त्याबद्दल समाधन व्यक्त केले. 120 हून अधिक प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित राहिले यावरून कार्यशाळेचे महत्व स्पष्ट होते असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा नगररचना विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वास्तुविशारद व विकासक यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटीबध्द असल्याचे सांगत सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांनी महाआयटीचे अधिकारी तसेच उपस्थित वास्तुविशारद व विकासकांचे आभार मानले.
Published on : 21-12-2022 13:09:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update