तुर्भे फळ मार्केटमधील 2 व्यापा-यांकडून दीड टन प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त
प्लास्टिकमुक्त नवी मुंबई चे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना गती प्राप्त झालेली दिसत असून किरकोळ प्लास्टिक विक्रेत्यांप्रमाणेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या साठ्यांवर धडक कारवाई केली जात आहे.
अशाच प्रकारची धडाकेबाज कारवाई तुर्भे एपीएमसी मार्केटमधील 2 दुकानांवर करीत त्या ठिकाणाहून 4 ते 5 ट्रक भरेल इतक्या मोठ्या प्रमाणात साधारणत: 1.5 टन प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुखदेव येडवे आणि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.
एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळून येत असल्याच्या अनुषंगाने विभाग कार्यालयामार्फत त्या परिसरात नियमितपणे कारवाई करण्यात येत असते. त्यामध्ये तुर्भे एपीएमसी फ्रुट मार्केट अंतर्गत सेक्टर 19 येथील 2 दुकानदारांकडे प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये साधारणत: 1500 किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला व रु. 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. हा जप्त केलेला प्लास्टिकचा साठा महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा प्रकल्पस्थळी नेण्यात येऊन त्याच्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग, फ्रुट मार्केट, सेक्टर 19, तुर्भे येथील हाय ग्रीप पॅकेजिंग तसेच बाबा साई पॅकेजिंग या व्यावसायिकांकडेही प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्याने पहिल्यांदाच गुन्हा असल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी रु.5000/- प्रमाणे एकूण रु.10000/ इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया तीव्रतेने राबविण्यात येत असून नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी पिशव्यांचा वापर करावा व प्लास्टिकला आपल्या दैनंदिन वापरातून हद्दपार करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 27-12-2022 13:35:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update