भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका करतेय मराठी भाषेचा जागर
राजभाषा मराठीचे संवर्धन व्हावे व तिचा जास्तीत जास्त वापर व्हावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही मराठी भाषेचा गौरव वाढवित मराठी भाषेचा प्रचार - प्रसार करणारे तसेच कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा यादृष्टीने महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये – दि. 17 जानेवारी रोजी, सकाळी 11 वा. सुप्रसिध्द कवी श्री. अशोक नायगावकर यांचे 'मायबोली मराठी' या विषयावर व्याख्यान आणि त्यांच्या प्रसिध्द कवितांचे सादरीकरण संपन्न होणार आहे.
दि. 19 जानेवारी रोजी भाषा अभ्यासक श्री. वैभव चाळके 'शुध्दलेखनाच्या दिशेने….' या विषयांतर्गत सकाळी 11 वा. शुध्दलेखनाचे शासकीय नियम व लेखन या विषयावर अधिकारी, कर्मचारी यांचेशी सुसंवाद साधणार आहेत.
दि. 20 जानेवारी रोजी सायं. 4 वा. ‘कविता डॉट कॉम’ ही नवी मुंबईतील कवींची जिंदादील काव्यमैफल संपन्न होणार असून त्यामध्ये कवी प्रा. रविंद्र पाटील, श्री. जितेंद्र लाड, श्री. वैभव व-हाडी, श्री. शंकर गोपाळे, श्री. नारायण लांडगे पाटील, श्री. रुद्राक्ष पातारे आणि डॉ. कैलास गायकवाड सहभागी होणार आहेत.
दि. 24 जानेवारी रोजी सायं. 4 वा. सुप्रसिध्द साहित्यिक, कथाकार जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम – ‘जीए - स्मरणखुणा‘ आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये प्रा. वृषाली मगदूम, डॉ. मृण्मयी भजक आणि श्रीम. मिनाक्षी पाटील या जीएंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तसेच त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये कथन करीत काही कथांचे अभिवाचन करणार आहेत.
दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. नमुंमपा अधिकारी – कर्मचारीवृंदांची ‘स्वकाव्यवाचन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना स्वत:ची एकच स्वरचित कविता सादर करता येईल. ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच या स्पर्धेचा तसेच निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारभ संपन्न होणार आहे.
याशिवाय ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त, ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांचेकरिता ‘निबंध स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेकरिता (1) ‘पर्यावरण संवर्धन - माझी संकल्पना’ किंवा (2) ‘जागर अभिजात मराठीचा’ यापैकी एका विषयावर कमाल 2000 शब्द मर्यादेत आपले निबंध कागदाच्या एका बाजूला लिहून (पाठपोट नाही) सादर करावयाचे आहेत. नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांनी आपले निबंध दि. 20 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रशासन विभागाचे अधिक्षक श्री. अरविंद उरसळ (भ्र.क्र. 8369647455) यांचेकडे जमा करावयाचे आहेत.
तसेच काव्य स्पर्धेकरिता आपली नाव नोंदणी दि. 24 जानेवारी 2023 पर्यंत विधी अधिकारी श्री. अभय जाधव (भ्र.क्र. 7678004502), अधिक्षक (प्रशा.) श्री. अरविंद उरसळ (भ्र.क्र. 8369647455), अधिक्षक (आपत्ती व्यव.) श्री. रवी जाधव (भ्र.क्र. 9920378574) यांचेकडे करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई हे सांस्कृतिक शहर म्हणून नावारुपाला येत असताना महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदामध्येही सांस्कृतिकतेची जोपसना व्हावी व यातून मराठी भाषेचा दैनंदिन कामकाजात वापर वाढून गौरव व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका अतिशय उत्साहाने हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत आहे.
Published on : 13-01-2023 12:43:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update