दिव्यांगांकरिता आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश Inbox
दिव्यांगांविषयी केवळ सहानुभूती नाही तर त्यांना आपुलकीचा हात देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम ईटीसी केंद्रामार्फत केले जात असून यामध्ये काळानुरूप दिव्यांग सबलीकरणासाठी आणखी काही उपक्रमांचा समावेश करण्याच्या दृष्टीने सूचना कराव्यात तसेच दिव्यांगांसाठी अर्थसंकल्पात राखून ठेवण्यात येणारी अर्थसंकल्पाच्या 5 टक्के रक्कम दिव्यांग कल्याणकारी गोष्टींसाठी खर्च होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
ईटीसी केंद्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेत असताना आयुक्तांनी तेथील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली तसेच दिव्यांगांच्या पालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई आणि ईटीसी केंद्राचे विभाग प्रमुख तथा परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार आणि कार्यकारी अभियंता श्री. सुनिल ला़ड उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांची संख्या माहित असावी यादृष्टीने सन 2010 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. सद्यस्थितीत ईटीसी केंद्रामार्फत स्विकार हे पोर्टल सुरु असून त्यावर दिव्यांग व्यक्ती आपल्या नावाची व दिव्यांग प्रकाराची नोंदणी करू शकतात. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वेक्षण प्रक्रिया करण्याचे ठरविले असून शाळांमध्ये अर्ज वितरण करून सर्वेक्षण तसेच मोबाईल बेस्ड ॲपव्दारे सर्वेक्षण असे 2 प्रकारे करावयाची नियोजित असलेली दिव्यांग सर्वेक्षण प्रक्रिया तत्परतेने करावी असे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
सादरीकरणाव्दारे विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाची माहिती जाणून घेण्याबरोबरच आयुक्तांनी शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विविध कक्षांना भेटी देत त्याठिकाणी सुरु असलेली शिक्षण पध्दती प्रत्यक्ष अनुभवली तसेच त्याठिकाणी उपस्थित पालकांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले. ईटीसी केंद्रात आल्यानंतर मुलांच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल दिसून येत असल्याच्या पालकांच्या समाधानकारक प्रतिक्रिया जाणून घेत आयुक्तांनी त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना केंद्रापर्यंत ये-जा करण्यासाठी वाहन व्यवस्था असण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांचा विचार करून लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही करण्याचेही निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. सद्यस्थितीत दिव्यांगत्वाचे प्रमाण काहीसे वाढत असल्याचे निदर्शनास येत असून ईटीसी केंद्राची मर्यादा लक्षात घेता जास्तीत जास्त दिव्यांग मुलांना शिक्षण प्रशिक्षण मिळून ते आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील अशा प्रकारे कार्यवाही करण्याकरिता खाजगी शाळांनाही काही प्रमाणात अनुदान देऊन त्यांची मदत घेण्याचा पर्याय तपासून पहावा असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणा-या विशेष शिक्षकांची ईटीसी केद्रातील गरज लक्षात घेऊन आवश्यक पदांचा आकृतीबंध शासनाकडून मंजूर करून घेणेबाबत प्रयत्न केले जावेत असेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता व्यावसायिक प्रशिक्षण अधिक मोठ्या प्रमाणात सुरु करण्याचेही सूचित करण्यात आले. यावेळी ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांगांमार्फत करण्यात येणा-या फाईल निर्मितीच्या कामाची तसेच डाटा इन्ट्री कामाची पाहणी करत तसेच ते काम करणा-या दिव्यांगांशी संवाद साधत दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणारे आणखी कोणत्या प्रकारचे उपक्रम राबविले जाऊ शकतात यावरही अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत संबंधितांना देण्यात आले.
खेळाच्या माध्यमातूनही दिव्यांगांचा विकास अधिक गतीमानतेने होऊ शकतो तसेच त्यांच्यामधील अंगभूत क्रीडा गुणांनाही उत्तेजन मिळू शकते यादृष्टीने उत्तम दर्जाचे दिव्यांग क्रीडा संकुल उभे करण्याबाबतही पुढाकार घेऊन काम करावे असे अभियांत्रिकी विभागास आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
अनेक पालक आपल्या मुलांचे दिव्यांगत्व लपवितात किंवा अनेकांच्या ते उशिरा लक्षात येते ही बाब विचारात घेऊन याविषयी व्यापक जनजागृतीवर भर देण्यात यावा असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले.
ईटीसी केंद्रामधून मागील 16 वर्षात अनेक दिव्यांग विद्यार्थी पुढे जाऊन विविध क्षेत्रात सक्षमपणे काम करीत असतील, त्यांचा आदर्श नव्या विद्यार्थ्यांसमोर राहण्यासाठी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रात येणा-या व तेथून शिक्षित होऊन बाहेर जाणा-या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीकडेही केद्रामार्फत लक्ष ठेवण्यात यावे जेणेकरून अशा मुलांच्या यशोगाथा इतर मुलांसमोर ठेवता येतील ज्यामधून त्यांना प्रेरणा मिळेल त्याचप्रमाणे इथून बाहेर जाणा-या मुलांना काही अडचणी भासल्यास त्यांना मदत करणे शक्य होईल. यादृष्टीने येथील विद्यार्थ्यांवर पुढेही लक्ष ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले.
यापुढील काळात ईटीसी केंद्रामार्फत दिव्यांगांना आणखी कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील तसेच कोणते नवीन प्रशिक्षण वर्ग सुरु करता येतील याविषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
Published on : 19-01-2023 11:35:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update