नवी मुंबई महापालिकेच्या नागरी सुविधा कामांचा ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहराने गुणात्मक नागरी सुविधा व अत्याधुनिक प्रकल्पांमुळेही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नागरी विकासातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस नुकताच ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून ग्रेटर नोएडा येथील विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांनी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान स्विकारला.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायन्स पार्क, सेंट्रल लायब्ररी, एनएमएमटी उपक्रमाची वाशी येथील बहुउपयोगी आकर्षक इमारत यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारले जात असून यापूर्वीच्या लौकीकात लक्षणीय भर टाकली जात आहे.
उद्यानांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई शहरात वंडर्स पार्क, पंचतत्वावर आधारित सेंट्रल पार्क, झेन गार्डन, संवेदना उद्यान, निसर्ग उद्यान, रॉक गार्डन अशा विविध संकल्पनांवर आधारित थीम पार्क विकसित करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय वास्तू ही देशातील वास्तुरचनेचा एक आदर्शवत नमूना मानला जात असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची रचना व त्याचा डोम वास्तुकलेचा वैशिष्ट्यपूर्ण नमूना म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोणताही प्रकल्प, वास्तू उभारताना त्यामध्ये कामाच्या गुणवत्तेसोबतच त्याची वास्तुरचनाही वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे कोणतीही नागरी सुविधा दर्जेदार आणि लोकोपयोगी असण्यावर भर दिला जातो.
अशा विविध बाबींचा विचार कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्डच्या त्रयस्थ परीक्षण समितीने बारकाईने केलेला असून बांधकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्प क्षेत्रातील अभिनव व सर्वोत्तम कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची निवड नगरविकास क्षेत्रातील सर्वोत्तम महानगरपालिका म्हणून ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023’ करिता केलेली आहे.
सदर पुरस्कार हा केवळ नागरी सुविधा पुरवठा क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे जनतेला होत असलेल्या लाभापुरता सिमीत नाही तर त्यापुढे जात नवी मुंबई महानगरपालिकेला प्रदान केला जाणारा हा पुरस्कार इतरांनाही चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे परीक्षण समितीने नमूद केलेले आहे.
एआरके इव्हेन्ट्स ॲण्ड मिडीया प्रा.लि. संचालित कंन्स्ट्रक्शन टाईम्स या मासिकात नगरविकास क्षेत्राशी संबंधीत उल्लेखनीय काम करणा-या व्यक्ती / संस्था / समूह यांची नोंद घेत त्यांच्या उल्लेखनीय कामांची माहिती प्रसिध्द करून लोकांमध्ये प्रसारित केली जात असून ‘कॉनएक्स्पो इंडिया 2023’ सारखा भव्यतम उपक्रम राबवून त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणा-या व्यक्ती / संस्था यांना गौरविण्यात येते. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या उल्लेखनीय पायाभूत नागरी सुविधा कामांचा व बांधकामे आणि वास्तूंचा विचार करून कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023 प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
सदर पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचेकडे सन्मानपूर्वक सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, मुख्य लेखा व वि्त्त अधिकारी श्री. जितेंद्र इंगळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आऱदवाड, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे व श्री. मदन वाघचौडे उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी विकास कामांचा अभ्यास करून माध्यम क्षेत्रातील नामांकित संस्थेने ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023’ पुरस्काराने सन्मान होणे ही समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या शहर अभियंता श्री. संजय देसाई आणि त्यांच्या सर्व अधिकारी, कर्मचारी समूहाचे कौतुक केले आहे.
Published on : 02-02-2023 13:13:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update