छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत नवी मुंबईत दुमदुमले
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे कवीवर्य श्री. राजा बढे लिखीत स्फूर्तीदायक गीत महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून शासनाने स्विकृत केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांप्रसंगी शासनाने राज्यगीताची तयार केलेली ध्वनीफित प्रसारित करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी सावधान स्थितीत उभे रहात राज्यगीताच्या समूह गायनात सन्मानपूर्वक सहभाग घेतला.
वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून त्याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाने शिवचरित्र शिल्प वास्तूच्या ठिकाणी एकत्र जमत सामुहिक राज्यगीत गायनात सहभाग घेतला. तेथे नागरिकांच्या माहितीसाठी राज्यगीताचे मोठे फ्लेक्स होर्डींग लावण्यात आले होते. अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शिवप्रतिमापूजन झाल्यानंतरही राज्यगीताचे समुहगान करण्यात आले.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महापुरुषांच्या जयंती, स्मृतीदिनाचे औचित्य साधून जपली जाणारी व्याख्याने, परिसंवाद यासारखी वैचारिक परंपरा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जपत शाहीर रुपचंद चव्हाण यांच्या महाराष्ट्राचा शाहिरी बाणा या पोवाडे व शाहिरी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याही ठिकाणी शासनाने प्रसारित केलेली ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ही ध्वनीमुद्रीका वाजवून राज्यगीताचे सन्मानपूर्वक प्रसारण करण्यात आले. राज्यगीत सुरु असताना सभागृहातील प्रत्येक व्यक्तीने सावधान स्थितीत उभे राहून राज्यगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा राखली. राज्यगीताची लिंक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या, कवीवर्य राजा बढे यांच्या शब्दकळेने नटलेल्या व संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या संगीताने सजलेल्या महाराष्ट्र गीताने करीत शाहीर रुपचंद चव्हाण आणि त्यांच्या सहका-यांनी विविध ओजस्वी गीते सादर करून कार्यक्रम उंचावत नेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील स्फूर्तीगीते व पोवाडा याप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रगान व भीमगीते, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड अशी विविध लोकगीते त्यांनी दमदारपणे सादर केली. अशाप्रकारे विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी शासनाने स्विकृत केलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत प्रसारित करून व त्याचे समुहगान करून राज्यगीताचा यथोचीत सन्मान राखला गेला.
Published on : 21-02-2023 12:43:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update