आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची ऑन द स्पॉट स्वच्छता पाहणी
‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय वाक्य नजरेसमोर ठेवून शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित केले असून त्यादृष्टीने संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. या अनुषंगाने आज नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सकाळी 6.30 वाजल्यापासून नेरुळ, तुर्भे व वाशी विभागाचा तसेच तुर्भे विभागातील एम.आय.डी.सी. क्षेत्रातील स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले.
शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्वच्छता कामात अडथळा येतो हे लक्षात घेऊन आसपासच्या सोसायट्यांमधील पदाधिका-यांना व वाहन मालकांना याची कल्पना देण्यात यावी असे निर्देशित करतानाच जी वाहने ब-याच दिवसांपासून धूळ खात रस्त्याच्या कडेला उभी आहेत त्यांना नोटीस लावून ती उचलून घेण्याची कार्यवाही करावी व शहर स्वच्छतेतील अडथळा दूर करावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
ज्याठिकाणी रस्ते, पदपथ, गटारे यांची कामे सुरु आहेत व त्याच्या खोदकामाचे ढिगारे अस्ताव्यस्त पडून आहेत त्याठिकाणचे डेब्रीज व्यवस्थितरित्या ठेवले जाईल व त्याठिकाणी ग्रीन नेट लावले जाईल याकडेही लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या मुख्य रस्त्यांवर यांत्रिकी वाहनांव्दारे सफाई करण्यात अडचणी जाणवतात अशा ठिकाणी मनुष्यबळ लावून साफसफाई करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना देत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी कोणताही भाग दुर्लक्षतेमुळे अस्वच्छ राहिला अशा परिस्थितीत आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशित केले.
या दौ-यामध्ये माथाडी कामगार शिल्प चौक तुर्भे येथील सार्वजनिक शौचालयातील स्वच्छतेची व आवश्यक सुविधांची पाहणी करताना यासारख्या वापर जास्त असणा-या शौचालयांची सुविधा नियमित राहिल याबाबत तेथील केअर टेकरने व पर्यवेक्षकाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
अशाच प्रकारे तुर्भे नाका येथील फायझर रोडवर असलेल्या सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची पाहणी करताना त्या परिसरातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्याठिकाणी सध्या तांत्रिक साधने उपलब्ध होत नसल्याने बंद अवस्थेत असलेले ई-टॉयलेट्स व शी-टॉयलेट्स तेथील तांत्रिक रचना काढून सर्वसाधारण पध्दतीने सुरु राहतील याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित कऱण्यात आले.
झोपडपट्टी, गांवठाण भागालगतच्या मुख्य रस्त्यांवर लोक सकाळी कामाला जाताना आपला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून पुढे निघून जातात असे 2 ठिकाणी निदर्शनास आल्याने अशाप्रकारची मनोभूमिका बदलण्यासाठी त्या भागांमध्ये घराघरात जनजागृती करावी तसेच त्यांचा कचरा संकलीत करण्याची योग्य कार्यप्रणाली तातडीने कार्यान्वित करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहर सुशोभिकरणासाठी शहरातील मुख्य चौकात उभारलेल्या आकर्षक शिल्पाकृतींच्या सभोवताली असलेल्या रेलींगवर फ्लेक्स होर्डींग लावल्याचे निदर्शनास आल्याने सदर होर्डींग तातडीने काढून टाकण्याचे निर्देशित करतानाच नागरिकांनीही याबाबत सतर्क राहून शहर अस्वच्छतेला कारणीभूत ठरणारे होर्डींग महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या जागीच रितसर विभाग कार्यालयाची परवानगी घेऊन लावण्याचे आवाहन आयुक्तांमार्फत करण्यात आले. शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेला हानी पोहचणार नाही याची दखल नागरिकांनी घ्यावी व संबंधित महानगरपालिका विभाग कार्यालयानेही याबाबतच्या प्रतिबंधात्मक मोहिमा नियमितपणे व तीव्रतेने राबवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
मुख्य रस्त्यांवरील काही शिल्पांवर रहदारी जास्त असल्याने धूळ बसत असून अशा शिल्पाकृती नियमितपणे स्वच्छ करण्याची कार्यप्रणाली आखून द्यावी तसेच शिल्पे दुरुस्त करून घ्यावी असेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांना सूचित केले. याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक तथा तुर्भे विभागाचे स्वच्छता नोडल अधिकारी श्री. योगेश कडुसकर, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भरत धांडे, स्वच्छता अधिकारी श्री. सुधाकर वडजे उपस्थित होते.
नवी मुंबई शहर नियमित स्वच्छ रहावे ही बांधिलकी जपत नवी मुंबई महानगरपालिका काम करीत असून येथील जागरुक नागरिकांच्या संपूर्ण सक्रीय सहभागाशिवाय हे शक्य नाही. तरी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या घरातील कचरा ओला, सुका व घरगुती घातक अशा 3 प्रकारे वेगळा करावा व महानगरपालिकेकडेही वेगवेगळा द्यावा तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरातील कचरा उघड्यावर रस्त्यात टाकून शहर अस्वच्छतेची कृती करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.
Published on : 01-03-2023 13:07:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update