*सायन्स पार्कच्या कामाला गती देण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश*
नवी मुंबई शहराचे आणखी एक आकर्षण केंद्र होणा-या सायन्स पार्कच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सध्या सुरु असलेल्या कामाला अधिक गती देऊन दिलेल्या मुदतीमध्ये आगामी वर्षभराच्या कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले. याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, अतिरिक्त आयुक्त श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश गुमास्ते व श्री. सुनिल लाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगाला साजेसा व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात विलक्षण भर घालणारा सायन्स पार्क हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महत्वकांक्षी प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वंडर्स पार्क जवळील 19500 चौ.मी. बांधकाम क्षेत्रफळात उभारला जात असून यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञानाशी संबंधित अद्ययावत मॉडेल्स, प्रोजेक्ट्स, इमेजेस, ऑडियो व्हिज्युयल फिल्म्स अशा विविध अत्याधुनिक साधनांचा वापर केला जाणार आहे. मोठ्यांप्रमाणेच विशेषत्वाने लहान व कुमारवयीन मुले आणि युवक यांच्याकरिता येथील विविध गोष्टींमधून माहिती व ज्ञानाचा खजिना खुला केला जाणार असून ‘हसत खेळत विज्ञान’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
सायन्स पार्कचे बांधकाम सुरु असतानाच त्याठिकाणी उपलब्ध करून द्यावयाच्या प्रदर्शनीमधील साहित्य, उपकरणे व इतर बाबींची उपलब्धता करून घेण्याबाबतच्या अंदाजपत्रक मंजूरीची कार्यवाहीदेखील सुरु करावी व या दोन्ही गोष्टी समांतर रितीने पूर्ण होतील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
सायन्स पार्क हे नवी मुंबई शहराचे आकर्षण केंद्र होणार असून येथील वैशिष्टपूर्ण सुविधांमुळे याठिकाणी केवळ नवी मुंबईतूनच नव्हे तर आसपासच्या शहरांमधून तसेच संपूर्ण राज्यातून व देशाच्या विविध प्रांतातून आणि परदेशातून पर्यटक भेटी देणार आहेत. येथे प्रदर्शित केले जाणारे प्रकल्प व सुविधा या देशापरदेशातील अशा इतर सायन्स पार्कपेक्षा अतिशय आगळ्यावेगळ्या असाव्यात याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
याठिकाणी भेटी देणा-या देशीपरदेशी पर्यटकांच्या मनात नवी मुंबई शहराची स्वच्छ व सुंदर प्रतिमा अधोरेखीत व्हावी यादृष्टीने सायन्स पार्कच्या भोवतालचा परिसर त्याला साजेसा करावा असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले. सायन्स पार्क पाहण्यासाठी शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणावर येऊ शकतील हे लक्षात घेऊन शाळांच्या व इतर बसेसची पार्कींग व्यवस्था पुरेशा प्रमाणात ठेवण्याबाबतही आताच नियोजन करावे असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
विशेषत्वाने सायन्स पार्कला भेट देणारे पर्यटक शेजारील वंडर्स पार्कलाही भेट देतीलच हे लक्षात घेऊन या दोन्हींचा समन्वय राखून पर्यटन स्थळ विकसनाच्या दृष्टीने संयुक्त विचार व्हावा व तशा प्रकारचे नियोजन करावे अशाही सूचना आयुक्तांमार्फत अभियांत्रिकी विभागास देण्यात आल्या.
सद्यस्थितीत पहिल्या मजल्यावरचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून दुस-या मजल्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या संपूर्ण कामाची प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी करत व त्यांचे नकाशे पाहून नियोजनाविषयी बारकाईने माहिती घेत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सुरु असलेल्या कामाला दर्जा राखून गती द्यावी व विहित कालावधीत काम पूर्ण होईल याप्रकारे वेळेचे नियोजन करावे असेही निर्देश दिले.
Published on : 04-05-2023 13:10:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update