विभाग कार्यालयांमध्ये जाऊन तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केली बेलापूर विभागापासून सुरुवात
महानगरपालिकेशी संबंधित कामांबाबत नागरिकांचा नियमित संपर्क विभाग कार्यालयांशी असतो. त्या अनुषंगाने विभाग कार्यालयामध्ये जाऊन तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास नमुंमपा आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी सुरुवात केली असून आज त्यांनी बेलापूर विभाग कार्यालयाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. अमरिश पटनिगिरे, श्री. सोमनाथ पोटरे, श्री. अनंत जाधव, श्री. दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंत श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड आणि सर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
विभाग कार्यालयांसाठी महानगरपालिकेच्या आकृतीबंधात मंजूर झालेला अधिकारी, कर्मचा-यांचा आराखडा जाणून घेत प्रत्यक्षात विभाग कार्यालयात कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या कर्मचा-यांची आयुक्तांनी बारकाईने माहिती घेतली. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप जाणून घेत आयुक्तांनी सर्वच विभाग कार्यालयातील विद्यमान स्थितीची माहिती घेतली.
बेलापूर विभागात सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती घेत आयुक्तांनी किती कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार याचीही माहिती जाणून घेतली. पावसाळा कालावधीच्या अनुषंगाने बेलापूर विभागात सुरु असलेल्या नालेसफाई, बंदिस्त गटारे सफाई, मलनि:स्सारण वाहिन्या सफाई कामांचा आयुक्तांनी परिसरनिहाय आढावा घेतला व काम झाल्यावर त्याठिकाणची झाकणे व्यवस्थित लावली जातील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. या कामाची जबाबदारी संबंधित भागाचा कनिष्ठ अभियंता व स्वच्छता अधिकारी यांच्यावर निश्चित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी केल्या. नालेसफाई कामांची सद्यस्थिती जाणून घेताना ही कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विशेषत्वाने सेक्टर 4, 5, 6 येथील नाल्याची सफाई अधिक काळजीपूर्वक करण्याचे निर्देश देत त्याठिकाणी 2-4 दिवसात कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मुसळधार पाऊस आणि मोठ्या भरतीची वेळ जमून आल्यास पावसाळ्यात शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते अशी 14 ठिकाणे शहरात असून त्यांची सविस्तर माहिती घेत त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची संख्या वाढवावी व पाणी साचून राहणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामामुळे पावसाळी कालावधीत त्या आसपासच्या परिसरात पाणी साचणार नाही याची खातरजमा करून घ्यावी अशा स्पष्ट सूचना दिघा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व परिमंडळ उपआयुक्तांना देण्यात आल्या.
विभागातील इलेक्ट्रीकल डिपी यांचे दरवाजे व्यवस्थित बंद असतील तसेच उघड्या केबल्स झाकलेल्या असतील याची खात्री विभागातील विदयुत अभियंता यांनी करून घ्यावी व एमएसईडीसीएल मार्फत आवश्यक कामे करून घ्यावीत असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
धोकादायक झाडांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करतानाच मुख्य रस्त्यावरील झाडांची छाटणी करावी झाडे तोडू नयेत अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. त्याचप्रमाणे छाटणी केलेल्या झाडांच्या फांदया लगेच उचलल्या जातील याचे भान ठेवून संबंधित विभागातील उद्यान अधिकारी आणि स्वच्छता अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवावा असेही आयुक्तांनी निर्देशित केले. झाडे छाटणी वाहन पोहचत नाही अशा ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून आवश्यक झाडे छाटणी करावी व याकामात उद्यान विभाग आणि विभाग कार्यालय यांनी परस्पर समन्वय राखावा अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. उड्डाणपूल, भिंती, पदपथाचे कॉर्नर्स येथील फटीमध्ये उगवणारी वड, पिंपळ अशी वृक्षरोपे निदर्शनास येताच काढून टाकली जावीत असेही निर्देश देण्यात आले.
अनेक ठिकाणी पदपथावर रस्त्यावर त्या बाजूला सुरु असलेल्या बांधकामाचे साहित्य ढिगारे लावून ठेवलेले असते. त्याची नागरिकांना व रहदारीला अडचण होत असते. अशा ठिकाणी विभाग कार्यालयामार्फत सूचना देण्यात याव्यात असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
धोकादायक इमारतींची यादी लवकरात लवकर प्रसिध्द करावी जेणेकरून त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होईल असे सूचित करतानाच आयुक्तांनी विभागनिहाय सी - 1 कॅटेगरीतील इमारतींच्या स्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना स्थलांतरित करावे असे निर्देश विभाग अधिकारी यांना दिले.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय सर्वेक्षणाच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देशित करतानाच सर्व संबंधित घटकांनी चेकलिस्टप्रमाणे प्रत्येक बाबीची नियमित तपासणी करावी व आवश्यक बाबींची पूर्तता करावी अशा सूचना केल्या. शौचालयांच्या स्वच्छतेकडे तसेच वाणिज्य भागाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले..
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार 5 जूनपर्यंत ‘21 डेज चॅलेंज' 'थ्री आर' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे असून त्यामध्ये लोकसहभागाला विशेष प्राधान्य द्यावयाचे असल्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
नागरिकांच्या सोयीसाठी विभाग कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या नागरी सुविधा केंद्रातील उपलब्ध सेवांची माहिती घेत नागरिकांना विभाग कार्यालयात येण्याची गरजच भासू नये अशाप्रकारे अधिकाधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी संगणक विभागाला दिले.
विभाग अधिकारी हा आपल्या विभाग क्षेत्राचा प्रमुख असून त्याचे विभागातील प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष हवे ही अपेक्षा व्यक्त करीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विभाग कार्यालये सक्षमीकरणावर भर देण्याच्या दृष्टीने तेथे प्रत्यक्ष जाऊन व तेथील कामकाजाचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे व त्यादृष्टीने विभाग कार्यालयातील आढावा बैठकींना सुरुवात केली आहे.
Published on : 19-05-2023 14:53:11,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update