*पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नमुंमपा आरोग्य विभाग दक्ष*
.jpeg)
पावसाळा कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे साथीचे आजार पसरतात. हा धोका लक्षात घेऊन या आजारांवर नियंत्रण आणून नवी मुंबई शहराचे आरोग्य अबाधीत राखण्यासाठी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आरोग्य विभागास दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय सहाय्यक यांची विशेष बैठक घेत साथीचे आजार नियंत्रित ठेवण्यासाठी सर्व दृष्टीने सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचा थेट संबंध नागरिकांशी स्थानिक पातळीवर येतो. त्यामुळे पावसाळी कालावधीत सर्वसाधारपणे निदर्शनास येत असलेल्या सर्दी, खोकला, अतिसार, जुलाब, ताप अशा आजारांवर आपल्या नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांची भूमिका पावसाळी कालावधीसह नेहमीच महत्वाची असते. त्यामुळे या केंद्रांना सतर्क करून दक्ष राहण्याचे निर्देश आरोग्य विभागप्रमुखांमार्फत देण्यात आले.
या बैठकीत त्यांनी साथीचे आजारांप्रमाणेच राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत साप्ताहिक वेळापत्रकानुसार डास अळी नाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कार्यक्रमावर विशेष लक्ष देण्याचे सूचित केले. यामध्ये त्यांनी डास अळी नाशक कामाची तसेच हिवताप, डेंगी रुग्णांची केंद्रनिहाय माहिती घेतली.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत होत असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी पावसाळा कालावधीमध्ये गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, घरावरील टाकलेले प्लास्टिक, कुंडयाखालील ताटल्या यामध्ये पाणी साचून डास अंडी घालतात त्यामुळे अशा निरुपयोगी वस्तू नष्ट करण्याचा संदेश व्यापक प्रमाणात आपापल्या क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहचवावा अशा सूचना वैद्यकीय अधिका-यांना केल्या.
त्याचप्रमाणे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण सेवांतर्गत तसेच कार्यक्षेत्रात आढळणा-या प्रत्येक ताप आलेल्या रुग्णाची आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत रक्त तपासणी करण्यात यावी असेही सूचित करण्यात आले. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रनिहाय हिवताप, डेंगी रुग्णांच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील कार्यक्षेत्र यांचा स्पॉट मॅपींगव्दारे कृती आराखडा तयार करुन घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने विशेष शोध मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रनिहाय कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये व प्रयोगशाळा याठिकाणी प्रत्येक आठवड्याला पाठपुरावा करुन हिवताप, डेंगी आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक हिवताप, डेंगी रुग्णांची रुग्णशोध कार्यवाही प्रभावीपणे राबविण्यात यावी असे निर्देश देण्यात आले.
त्याचप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व बांधकाम ठिकाणांची यादी अद्ययावत करुन आठवड्यातून एकदा त्या बांधकाम ठिकाणाची स्थळ पाहणी करून संभाव्य डासउत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत तसेच तेथील बांधकाम मजुरांचे नियमित ताप सर्वेक्षण करुन त्वरित रक्त तपासणी करण्यात यावी व लवकरात लवकर रुग्ण निदान करुन त्यांना समूळ उपचार देण्यात यावेत अशाही सूचना सर्वांना देण्यात आल्या.
मे 2023 महिन्यामध्ये राबविण्यात आलेल्या घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने विशेष तपासणी मोहिमेमध्ये 16250 घरांना भेटी देण्यात आलेल्या असून त्यापैकी 19383 घरांतर्गत स्थानांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 51 स्थाने दूषित आढळून आलेली आहेत. त्यापैकी 51 स्थाने नष्ट करण्यात आली असून त्यामध्ये 96 ताप रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये जागरुकतेकरिता विभागाविभागात सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाव्दारे व हस्तपत्रकाव्दारे हिवताप, संशयित डेंगी अशा किटकजन्य आजाराबाबतची जनजागृती केली जात आहे. यामध्ये पावसाळा कालावधीच्या अनुषंगाने वाढ करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
पावसाळा कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून आपल्या घरात व घराभोवतालच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच हिवताप, डेंग्यूची लक्षणे आढळून आल्यास नजिकच्या महानगरपालिका प्राथमिक नागरी आऱोग्य केंद्राशी संपर्क साधावा व महापालिका रुग्णालयात वैद्यकीय सेवा घ्यावी तसेच महानगरपालिकेमार्फत आपल्या घरी भेटी देणा-या हिवताप कर्मचा-यास संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 15-06-2023 13:48:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update